राज की बात
अहमदनगर |९ एप्रिल | भैरवनाथ वाकळे
(History) भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात काही घटना अशा असतात ज्या केवळ स्मृती नव्हे, तर ठरवून जागवलेल्या प्रेरणा असतात. अशाच घटनांपैकी एक म्हणजे कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभारलेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा. विशेष बाब म्हणजे हा पुतळा डॉ. आंबेडकर हयात असताना ९ डिसेंबर १९५० रोजी बसविण्यात आला होता. प्रसिद्ध शिल्पकार बाळ चव्हाण यांनी तयार केलेला हा पुतळा तत्कालीन नगराध्यक्ष द.मा. साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रतिमा समिती’कडून नगरपालिकेस करवीर जनतेच्यावतीने तो प्रदान करण्यात आला. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले आणि ९ डिसेंबर १९५० ला त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले.
(History) बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकांतून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले आणि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले गेले होते. आज देशात सर्वधिक पुतळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत, मात्र या पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सर्व बहुजनांसह आंबेडकरवाद्यांसाठी बिंदू चौक हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. पुतळा उभारल्यानंतर, एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिल्याची आठवण मागच्या पिढीतील लोक सांगतात.
(History) ऐतिहासिक कार्यामागे होते एक सत्यशोधक विचारधारेने प्रेरित, अत्यंत प्रबुद्ध आणि सामाजिक जाण असलेले नेतृत्व, भाई माधवराव बागल. ही घटना फक्त पुतळा उभारण्याची नसून ती महाराष्ट्रातील सामाजिक समतेच्या चळवळीचा मैलाचा दगड ठरली. या घटनेचा इतिहास समजून घेताना आपणास महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या त्रिसूत्रीचा विचार करावा लागतो.
(History) महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जातीभेदाविरुद्ध आणि अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांच्यानंतर कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज हे पहिले प्रगतीशील शासक ठरले, ज्यांनी शिक्षण, आरक्षण आणि सामाजिक न्याय यांचा पाया घातला. म्हणूनच त्यांना ‘आरक्षणाचे जनक’ म्हणतात. त्यांच्या कार्याचा प्रभाव कोल्हापूरच्या समाजमनावर खोलवर होता. आणि त्याच या पार्श्वभूमीवर पुढे आलेले एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे भाई माधवराव बागल. हे महान चित्रकारसुध्दा होते. कलाकार किती संवेदनशिल असतो हे यातून दिसून येते. बाबासाहेब स्वत: व्हायोलिन वाजवत, चित्रे रेखाटत अशा व्यक्तिमत्वाचा एका कलाकाराने केलेला हा सन्मान होता.

भाई बागल हे फक्त सत्यशोधकच नव्हते, तर शाहू महाराजांच्या धोरणांचे खरे वारसदार होते. ते चित्रकार, पत्रकार, साहित्यिक, धाडसी पुढारी आणि एक प्रभावी समाजसुधारक होते. त्यांनी ‘ज्ञानोदय’ आणि ‘सत्यशोधक’ सारख्या मासिकांतून शोषित, दलित आणि बहुजन समाजाच्या आवाजाला धार दिली. त्यांच्या लेखणीत क्रांती होती आणि कृतीत परिवर्तन.
१९५० च्या दशकात कोल्हापूरमध्येही अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता पसरलेली होती. अनेक समाजघटकांमध्ये शिक्षणाचा अभाव, रोजगाराच्या संधींचा तुटवडा आणि सामाजिक प्रतिष्ठेची कमतरता होती. अशा वेळी भाई बागल यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कोल्हापूरच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळेच पाऊल उचलले, बाबासाहेबांचा पुतळा बिंदू चौकात उभारण्याचे.
९ डिसेंबर १९५० रोजी, मोठ्या आदरभावनेने आणि जनतेच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर एकदा स्वतः कोल्हापुरात आले आणि त्यांनी पुतळा पाहून भाई बागल यांच्या कार्याचे कौतुक केले. तो क्षण केवळ भावनिक नव्हता, तर कोल्हापूरच्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेचा पुरावा होता. भाई बागल यांचे हे कार्य म्हणजे सामाजिक न्यायाच्या चळवळीला प्राणवायू देणारे ठरले. त्यांनी आंबेडकरांच्या विचारांचे समर्थन करताना कोल्हापूरच्या तरुण पिढीत नवचैतन्य निर्माण केले. त्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी समतेचा, बंधुतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. आजही बिंदू चौकातील हा पुतळा केवळ एक वास्तू नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. दरवर्षी लाखो लोक या पवित्र स्थळी येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. कोल्हापूरची ही माती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी समृद्ध झाली असून, भाई बागल यांच्या कृतीने ती अभिमानाने इतिहासात नोंदली गेली आहे.
त्यांना माहित होते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतके महान आहेत की, त्यांची प्रेरणा येत्या पिढ्यांना त्यांच्या हयातीत दिली पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा कोणीच मोठे नाही.
या घटनेची आठवण म्हणजे केवळ गौरवशाली भूतकाळाची नव्हे, तर आजच्या पिढीला सामाजिक भान देणारी आणि कृतीत परिवर्तन घडवणारी प्रेरणा आहे, हे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.