प्रासंगिक
११ एप्रिल | कुमार आहेर
(History) या जगात सर्वप्रथम कोण अवतरलं? मानव की ईश्वर?
समूह : मानव.
मग ईश्वराची निर्मिती कोणी केली?
समूह : मानवाने.
मग ईश्वर श्रेष्ठ का मानव श्रेष्ठ ?
समूह : मानव श्रेष्ठ…मानव श्रेष्ठ…
जर का मानवाने ईश्वराची निर्मिती केली आहे तर ईश्वराच्या नावाने लढाई का करावी ?
(History) सध्याच्या विज्ञानयुगात देव आधी का माणूस आधी ? हा विचार करायला कोणीच आपल्या बुद्धीला ताण देत नाही. आजही तो गोंधळलेल्या अवस्थेतच आहे.
११ एप्रिल ते १४ एप्रिल फुले आंबेडकरी महोत्सव. त्यांच्या जयंत्या करण्यातच सगळे दंग आहेत. त्यांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी त्यांनाच डोक्यावर घेऊन लोक नाचत आहेत. साऊंडच्या मोठमोठ्या भिंती उभ्या करून डी.जे. स्पीकर लावून मिरवणुका काढल्या जात आहेत. या मिरवणुकीसाठी सत्ताधारी पक्ष मंडळांना भरमसाठ वर्गण्यात येत आहेत. मिरवणुका काढणारे आनंदी, तर त्या कर्कश्य आवाजामुळे आणि ट्रॅफिकच्या गर्दीत अडकलेली मंडळी नाक मुरडत आहे. पुढाऱ्यांची भाषण, हारतुरे घोषणा यामुळे सारा परिसर दणाणून गेलेला आहे. बौद्धांनी फुले हायजॅक केले, अशाही चर्चांना उधाण आले आहे. परंतु आज महात्मा फुले किती जणांनी वाचले ? किती जणांनी समजून उमजून घेतले ? आणि त्यांच्या विचारांवर कितीजण पावलावर पाऊल ठेवून चालले आहेत ? याची चिकित्सा होणार की नाही?
धर्म चिकित्सा करणारे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार सत्यशोधक समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती. (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) महात्मा फुले शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, आधुनिक नाटककार, निबंधकार, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक मराठी कवितेचे जनक, पुण्याचे आयुक्त, पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टींग कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे हे सगळे कार्य म्हणजे मानवमुक्तीचा जाहीरनामाच आहे.
महात्मा फुले यांनी गुलामगिरी, तृतीय रत्न नाटक, छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा आसूड, अस्पृश्यांची कैफियत, अखंड काव्यरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिले. हे सर्व साहित्य स्त्री पुरुष समानता, जाती निर्मूलन, ज्ञान निर्मिती, धर्मचिकित्सा, सामाजिक न्याय, आंतरजातीय विवाह, शिक्षण प्रसार आणि प्रचार यावर आधारित आहे. महात्मा फुले यांनी आपले साहित्यातून व आपल्या कृतीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घातले.
महात्मा फुले आपल्या अखंडात म्हणतात.
आता तरी मागे येऊ नका l धिक्कारून टाका ती मनस्मृति ll
विद्या शिकताच पावेल ते सुख l घ्यावा माझा लेख l ज्योती म्हणे ||
(History) समाजाला सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक स्वातंत्र्य नव्हते ब्राह्मणवर्गाचे वर्चस्व होते. या सामाजिक हक्कांसाठी, सर्व बहुजनांनी बंडाचे हत्यार उचलावे असा महात्मा फुले यांचा हेतू होता. हा हेतू साध्य करण्यासाठी त्यांनी आपल्या कला कौशल्याने आपल्या साहित्यातून, कृतीतून प्रबोधन केले. पण हे सामाजिक प्रबोधन करत असताना किंवा ही भटशाही नाकारताना समाजाला पर्याय देणे गरजेचे असते आणि हाच पर्याय महात्मा फुले यांनी, भारतातील ही धर्म व्यवस्था नाकारून २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात त्यांनी देवाला निर्मिक म्हटले आहे. त्यांनी निर्मिती या नव्या संकल्पनेची मांडणी केली आहे. ही निर्मिक संकल्पना कोणत्याही विशिष्ट धर्मग्रंथावर आधारित नसून संपूर्ण सृष्टीच्या उगमाशी संबंधित आहे. हा निर्मिक कोणालाही उच्च- नीच मानत नाही. कोणावरही अन्याय करत नाही. सर्वांवर समतेने कृपा करतो. ही संकल्पना त्यांच्या पुरोगामी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून साकार होत गेली होती. म्हणूनच महात्मा फुले आपल्या खंडात म्हणतात.
धर्मराज्य भेद मानवा नसावे l सत्याने वागावे ईशासाठी l
ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मण ,यांना धरावे उराशी l बंधुपरी l
निर्विकाचा धर्म सत्य आहे एक l मग भांडणे अनेक कशासाठी ll
यावरून त्यांचा सत्यशोधक समाज हा विश्वाशी मंगल मैत्री करणारा होता. विश्वबंधुत्वाचा होता. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व यावर आधारित होता.
महात्मा फुले संपूर्ण आयुष्यभर सत्यासाठीच लढले. सत्यासाठीच त्यांनी चिंतन, मनन करून कृतिशील कार्य केले आणि या सर्वाचा परिपाक म्हणजेच त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी सर्वात शेवटचे त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजेच, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. ते आपल्या १ एप्रिल १८८९ रोजी लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की, मला विस्तृतपणे लिहायचे होते. परंतु एकंदर सर्व मानव स्त्री-पुरुषांस आपापले प्रपंच आवरून जर का हा ग्रंथ त्यांस वाचता येईल तर एकंदर सर्व रिकामटेकडे धूर्त त्यांस लुटून खातील यास्तव एकंदर सर्व मानव स्त्रि-पुरुषांच्या उपयोगी हा ग्रंथ पडावा म्हणून या ग्रंथास सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक असे नाव दिले आहे.
एकंदरीत सार्वजनिक सत्य धर्म पुस्तकामध्ये सुख, धर्म पुस्तक, निर्माणकर्ता, पूजा, नामस्मरण, नैवद्य अथवा अन्नदान, अनुष्ठान, स्वर्ग/स्त्री-पुरुष, पाप पुण्य, जातिभेद, धर्म, नीती, तर्क, दैव, सत्य, आकाशातील ग्रह, जन्म, लग्न, दुष्टाचरण, मृत्यू, प्रेताची गती, श्राद्ध, वेद आणि सार्वजनिक सत्याची तुलना आणि एकंदर सर्व स्त्रीपुरुषांस ग्रंथकर्त्याची प्रार्थना बाबत याबाबतचे सत्य मांडण्यात आले आहे.
महात्मा फुले यांनी त्यांच्या खास शैलीने प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात हे पुस्तक लिहिलेले आहे. याचा आढावा घेतल्यास आपणास या पुस्तकाचे गांभीर्य समजून येईल. महात्मा फुले यांची निर्मिक संकल्पना विश्वव्यापी आहे, त्यांच्यामध्ये या विश्वातील प्रत्येक सजीवाचा निर्माता एकच आहे. निर्मिक कोणत्याही विशिष्ट जातीधर्माचा नाही. गटाचा नाही, उच्च- नीच? हलका- भारी, स्त्री- पुरुष असा भेद मानणारा नाही. हा, ना हिंदूंचा, ना मुसलमानांचा, ना ख्रिश्चनांचा, तो सर्वांचाच आहे. त्याची दृष्टी सर्वांकडे सारखीच असते. त्याला जर शोधायचे असेल तर ना देवळात, ना मस्जिदमध्ये, ना चर्चमध्ये. त्या निर्मिकाला शोधायचा असेल तर त्याला माणसात शोधा, माणसाची सेवा करा.
महात्मा फुले म्हणतात, या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवाने धर्मपुस्तके केली आहे त्यापैकी एकही ग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत एकसारखे सार्वजनिक सत्य नाही. कारण प्रत्येक धर्म पुस्तकांमध्ये काही एक व्यक्तींनी त्या वेळच्या प्रसंगास अनुसरून हेकडपणा केल्यामुळे ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा व द्वेष करू लागतात. दुसरे असे की, निर्माणकर्ता जर आपण सर्व मानवांचा निर्मित आहे तर एकंदर सर्व मानवी प्राण्यांपैकी प्रत्येक व्यक्तीस त्याने कृपाळू होऊन एकंदर सर्व उत्पन्न केलेल्या मानवी अधिकारांचा यथायोग उपभोग घेता यावा, असे घडून येत नसल्यामुळे त्यास अनेक प्रकारच्या दुःखासह अडचणी सोसाव्या लागतात.
नुकताच कुंभमेळ्यासंदर्भात दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण वाचत असतो. पर्यावरणवादी आणि बुद्धिवादी लोकांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान करणे ही अंधश्रद्धा आहे तसेच गंगेच्या नदीत अंघोळ केल्याने पाप धुतले जाते हा लोकांचा गैरसमज आहे, असे म्हटले आहे. किंबहुना गंगेमध्ये धार्मिक सामग्री टाकली जाते, अंघोळी केल्या जातात, साबण आदी गोष्टींमुळे पाणी आणखी खराब झाले आहे. गंगा नदी स्वच्छ करण्याच्या योजनेत कोट्यावधी रुपये खर्च करूनही ती स्वच्छ झालेली नाही.
याबाबत महात्मा फुले यांनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, आपल्या या सूर्य मंडळासह आपण वस्ती करणाऱ्या पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे तर तीच वरील अनेक देशातील लोकांचा एकमेकांशी वैरभाव मागून प्रत्येकामध्ये देशाभिमान व धर्माभिमानाचे खूळ व्यर्थ का माजले आहे. त्याचप्रमाणे या पृथ्वीवरील अनेक देशातील सर्व नद्या महासागरास मिळत असता त्यापैकी एका देशातील नदी पवित्र कशी होऊ शकेल, कारण ती महापवित्र नदी श्वानाचे मलमूत्र पोटात घेऊन समुद्रास वाहून नेण्यास कधी मागे पुढे घेत नाही.
नुकतेच व्हाट्सअपवर व सोशल मीडियावर सुनीता विल्यम यांच्याबाबत अनेक अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बातम्या येत होत्या की, सुनीता विल्यम्स अंतराळातून येताना गंगाजल घेऊन आले आहेत. तसेच त्या अंतराळात हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणून गणपतीची मूर्ती घेऊन गेल्या होत्या. सोबत भगवद्गीता देखील घेऊन गेल्या होत्या. त्यामुळेच त्यांचा प्रवास यशस्वी झाला. याबाबत महात्मा फुले यांनी अगोदरच सांगून ठेवले आहे की, पूर्व अथवा पश्चिम अथवा दक्षिण अथवा उत्तर इत्यादी दहा दिशांपैकी एकातरी दिशेचा आपण शोध करू लागल्यास तीचा अंत लागेल काय ? सर्व दिशांच्या पोकळीची लांबी रुंदी उंची खोली याचा थांगपत्ता लागणार नाही. ती अनंत आहे. आपल्या पृथ्वीवरील प्राणीमात्रांसह पशु, पक्षी, वृक्ष इत्यादीकांस ज्याने निर्माण केले आहे, तो काय करतो ? कोठे व तो कसा आहे ? हे पाहण्याची आपण मानव प्राण्यांनी इच्छा करू नये. कारण आम्हा प्राण्यांचे आयुष्य ते किती आहे? याकरिता निर्माणकर्ता कोण ? या फांद्यात न पडता मानवाने सत्याच्या मार्गाने आपले जीवन सार्थकी लावावे.
आपल्या निर्माणकर्त्यावर फुले चढवून त्याची पूजा कोणत्या तऱ्हेने करावी ? फुले म्हणतात की, पृथ्वीवरील पुष्प वगैरे सर्व सुवासिक पदार्थ जर निर्माणकर्त्यांनी दया दृष्टीने आपल्या मानवाच्या उपभोगासाठी उत्पन्न केली आहेत तर त्यापैकी कोणता पदार्थ उलटा आपण निर्मिकावर वाहून त्याची पूजा करावी ? एकंदर सर्व पदार्थ निर्मिकाने जर उत्पन्न केलेली आहेत, तर आपल्याजवळ आपले स्वतःचे काय आहे ? ते निर्माणकर्त्यावर वाहून त्याची पूजा करावी ? त्यापेक्षा जे सत्पुरुष जगाच्या कल्याणासाठी झटतात त्या सत्पुरुषांस फुलांच्या माळा करून नित्य ईश्वराच्या नावाने अर्पण केल्यास पुष्पाचे सार्थक झाले असे समजावे.
सध्या वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. तरुण पिढी वयोवृद्धआई-वडिलांची सेवा करण्याऐवजी धार्मिक विधी, धार्मिक यात्रा, पूजा, होम हवन, कर्मकांड यामध्ये अडकलेली आहे. आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करीत आहे व नामस्मरण, पूजाअर्चा यामध्ये अडकले आहेत. देवाचे नामस्मरण केल्याने देव संतुष्ट होत नाही किंवा प्रसन्न देखील होत नाही. आई-वडिलांची सेवा करण्याचे कर्तव्य पार केल्याने देव संतुष्ट होईल. याबाबत महात्मा फुले आपल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये म्हणतात,
“एखाद्या व्यक्तीला दहा मुले आहेत आणि त्या व्यक्तींनी त्या दाही मुलांना लहानाचे मोठे केले ते वयोवृद्ध झाले. तेव्हा थोरल्या मुलाने त्यांचे पालनपोषण न करता ‘माझी आई, माझे वडील’ असे पोकळ नामस्मरण केले तर त्या आई-वडिलांना उपाशी मरावे लागेल परंतु दुसऱ्या मुलाने नामस्मरण करता त्या आईवडिलांचे पालनपोषण केले तर त्यांचे आईवडील सुखी होऊन आनंदी पावतील. तद्वत ढोंगी बैराग्याची सोंग घेऊन सर्वकाळ भांग पिऊन तिच्या अंमलांत अज्ञानी भोळ्याजणांचे मिष्ठान्नावर नित्य ताव देऊन लाल गाजरासारखे गलेलठ्ठ पडून निरर्थक निर्मिकाचे नामस्मरण करितात. तेव्हा आपण मानवांनी अशा भोंदू ढोंगी लोकांचे ऐकून निर्मिकाचे नामस्मरण देखील करू नये, त्यापेक्षा दिलेले कर्तव्य पार पाडावे. हेच खऱ्या अर्थाने स्मरण आहे ”
महात्मा फुले म्हणतात, नैवेद्य अथवा अन्नदान निर्मिकास दाखवून तृप्त करण्याऐवजी पंगु लोकास अथवा परक्या मुलास निर्मिकाच्या नावाने यथाशक्ती मदत करावी. निर्मिकाने या आपल्या पृथ्वीवर जलचर, स्थलचर व उभयचर अशा प्रकारच्या जीवांच्या तीन जाती निर्माण केल्या आहेत. त्यापैकी प्राणीमात्रात मानवप्राणी श्रेष्ठ आहे. त्यामध्ये स्त्री आणि पुरुष असे दोन भेद आहेत. या उभयांतांमध्ये जास्त श्रेष्ठ स्त्री आहे. कारण, तीच आपल्या सर्वांना जन्म देते. पालन पोषण करते. काळजी वाहते. चालायला बोलायला शिकवते. निरपेक्ष बुद्धीने सर्वांशी वागते. स्त्रिया पुरुषांवर जास्त प्रीती करतात, कारण पूर्वी कित्येक स्त्रिया सती देखील जात असत, परंतु पुरुषाला तिच्याविषयी दुःख होऊन तो कधी सता गेलेला ऐकला आहे काय? जसजसा मानव आधुनिकतेकडे चालेला आहे, तसातसा तो धर्माला जास्त चिटकू लागला आहे. पूर्वीच्या काळामध्ये जी शिवाशिवा होती, ती नष्ट झाली परंतु माणसाच्या मनातली जात अजून गेलेली नाही. धर्माबद्दलची तेढ वाढत चालली आहे. १७ मार्च २०२५ रोजी नागपूरमध्ये औरंगजेबाच्या थडक्याच्या हटवण्याच्या मागणीसाठी दोन समुदायांमध्ये हिंसक चकमकी झाल्या. फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील अंत्रोली गावात विक्रम गायकवाड या उच्चशिक्षित बौद्ध मुलाने सप्टेंबर २०२४ मध्ये आंतरजातीय विवाह केला म्हणून त्याची ८ फेब्रुवारी २०२५ रोजी हत्या करण्यात आली. सध्या चित्रपटाच्या माध्यमातून देखील जाती-धर्माचे जाणीवपूर्वक राजकारण केले जाते. जे ‘स्वराज्याचे रक्षक’ आहे त्यांना ‘धर्मरक्षक’ म्हणून संबोधले जाते. चित्रपटातून राष्ट्रपुरुषांच्या कार्य कर्तृत्वांचा मागवा घेण्याऐवजी, नको त्या गोष्टींवर लोकांचे हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित केले जाते. आता रस्त्यावर भाजी विकणारा, गवंड्याच्या हाताखाली काम करणारा, मोलमजुरी करून पोट भरणारा माणूस देखील धर्माची भाषा बोलू लागला आहे. धर्म टिकला पाहिजे असे बोलू लागला आहे. राजकीय पुढारी सामान्य जनतेला अमिष दाखवून स्वतःच्या खर्चातून धर्मयात्रा करीत आहेत. अष्टविनायक दर्शन, बालाजी दर्शन, मोहटादेवी दर्शन, आयोध्या दर्शन, शिर्डी दर्शन, कुंभमेळा अशा सहली काढत आहे. धर्म हा जोडण्यासाठी आहे हे न सांगता धर्माच्या नावाखाली धर्माधर्मात वितुष्ट आणण्याचे काम काही माणसे करीत आहेत. आता धर्मानुसार झेंड्यांचे रंग झाले आहेत. कोणत्याही धर्माच्या, झेंड्याचा रंग दिसला तरी सामान्य माणसाच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. अशी परिस्थिती आलेली आहे की जात, धर्म, पंथ अधिक बलवान होत आहे.
धर्माबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना महात्मा फुले अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने सवाल करतात. ते म्हणतात, उत्पन्नाचे साधन म्हणून कपडे धुणे आणि त्यावर आपला उपजीविका करणे हा जर का परिटाचा धर्म असेल, तर आपण कधीकधी आपली स्वतःचीच वस्त्रे घरी धुत नाहीत काय ? उत्पन्नाचे साधन म्हणून आपल्या सर्वांच्या हजामती करून त्यावर उपजीविका करणे हा जर का न्हाव्याचा धर्म असेल तर, आपण नेहमी आपल्या नाजूक जागेचे केस बाजूला जाऊन भादरीत नाही काय? …आपल्या सर्वांचे गुमूत काढून त्यावर आपला निर्वाह करणे हा जर हलालखोरांचा धर्म आहे, तर मग आपण आपल्या घरात बिछान्यावर पडलेल्या आजारी माणसांचा गु-मुत बाहेर टाकीत नाही काय? एखाद्या ठोंब्या आर्यभट्ट ब्राह्मणाने दुसऱ्याची शरणागती पत्करून त्याचा गु-मूत काढल्यास त्याला तुम्ही हलालखोर म्हणाल काय? जसे धनगरांनी मेंढरे पाळून त्यास चारणे हा त्याचा धर्म नव्हे, शेती कामे करणे हा कुळवाड्याचा धर्म नव्हे त्याचा उद्योग आहे. मळ्यामध्ये काम करणे माळ्याचा धर्म नव्हे उद्योग आहे. जोडा शिवणे हा चर्मकाराचा धर्म नव्हे धंदा आहे रखवाली करणे रामोशाचा धर्म नव्हे धंदा आहे. म्हणून ते आपल्या अखंडात म्हणतात..
सत्य सर्वांचे आदीघर l सर्व धर्मांचे माहेर ll
जगा माझी सुख सारे l खास सत्याची बा पोरे ll
सत्य सुखाला आधार l बाकी सर्व अंधकार ll
आजपर्यंत जी जी धर्मपुस्तके लिहिली गेली आहेत ते सत्पुरुषांनीच लिहिलेली आहे परंतु एखादे धर्मपुस्तक स्त्रीने लिहिलेले नाही ही शोकांतिका आहे. जे जे धर्म सद्यस्थितीत अस्तित्वात आहे ते आपल्या धर्मावरून व दुसऱ्याच्या धर्माविषयी सारासार विचार न करता माझा धर्म खरा आहे म्हणून बेलगामी हट्ट करून बसतात परंतु एकमेकांच्या धर्माविषयी सारासार विचार केल्याबरोबरच कोणीच कोणाच्या धर्माला खोटे म्हणणार नाही, असे महात्मा फुले म्हणतात.
महात्मा फुले म्हणतात, सर्व स्त्रियांनी अथवा सर्व पुरुषांनी एकमेकात एकमेकांची कोणत्याच प्रकारची आवडनिवड न करता त्या सर्व स्त्री-पुरुषांनी या भूगोलावर आपले एक कुटुंब समजून एकमताने एकजुटीने एकमेकांशी सत्य वर्तन करून आपण सर्वांच्या निर्विकास संतोष देऊन आपण त्यांची आवडती लेकरे होता त्या सत्यवर्तन करणारे म्हणावेत. या भूमंडळावर महासत्पुरुषांनी जेवढी म्हणून धर्मपुस्तके केली आहेत. ती धर्मपुस्तके त्या सर्वात त्यावेळेस अनुसरून त्यांच्या समजूतीप्रमाणे काही ना काही सत्य आहे.
यास्तव कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्धधर्मी पुस्तक वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने जुना व नवा करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावे व त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने मोहम्मदी धर्मिय व्हावे आणि त्याच कुटुंबातील त्याच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावे.
सत्यशोधक महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात म्हणतात, या सर्व माता-पित्यांसह कन्यापुत्रांनी आपला प्रपंच करीत असता प्रत्येकाने कोणी कोणाच्या धर्माचा हेवा अथवा द्वेष करू नये आणि त्यासर्वांनी आपण सर्व निर्माणकर्त्याने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच म्हणजे निर्मिकाच्या कुटुंबातील आहोत, असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे म्हणजे ते आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याच्या राज्यात धन्य होतील. म्हणजेच सार्वजनिक धर्मपुस्तकात काही जर सत्य आहे तर या भूमंडळावर जेवढे म्हणून धर्म आहेत ते ‘सार्वजनिक सत्याची लेकरे आहेत’ अशी माझी खात्री आहे.
आज आपण धुमधडाक्यात महात्मा फुलेंची जयंती करतो. मोठमोठे फ्लेक्स लावतो त्यांच्या नावाने विविध योजनांच्या घोषणा केल्या जातात. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा झालेली आहे. त्याची श्रेय कोणाकडे यावर चर्चा सुरू आहे. एक जानेवारी १८४८ रोजी महात्मा फुले यांनी भिडेवाडा, बुधवार पेठ पुणे येथे पहिली दलित मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांनी सोबत त्यांचे सर्व जातीधर्माचे मित्र देखील होते. मुलींची शाळा सुरू करण्यासाठी फुलेंनी त्यांच्या पत्नीला सावित्रीबाईंना शिकवले. महात्मा फुले यांच्या अनेक महत्वपूर्ण कार्यापैकी त्यांनी भारतातली पहिली दलित मुलींची शाळा सुरू केली, हे सर्वात महत्त्वपूर्ण कार्य असताना देखील पुण्यातील दगडूशेठ गणपती समोरील भिडेवाडा येथे जे प्रस्तावित स्मारक होत आहे. तेथे महात्मा फुले यांचे नाव डावलून त्या ठिकाणी फक्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देशातील पहिली मुलींची शाळा असा पुणे महानगरपालिकेने बोर्ड लावलेला आहे. नुकताच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना एकत्रित भारतरत्न पुरस्कार देण्याचे भारत सरकारने ठराव पास केलेला आहे केलेला आहे. त्याप्रमाणे पुण्यातून शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना सोबत घेऊन केली. त्याच पुणे विद्यापीठाला फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव देण्यापेक्षा दोघांचे एकत्र नाव दिले असते तर ते अधिक उचित झाले असते. असे या महात्मा फुले यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त म्हणावेसे वाटते.
त्यावेळी विधवांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नसल्याने अनेक जणींना वेश्या व्यवसाय पत्करावा लागत असे. त्यावेळी या स्त्रिया बाळांचा जीव घेत किंवा स्वतःच जीव देत, यापासून परावृत्त करण्यासाठी ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या राहत्या घरात स्वतःची मिळकत, स्वतःच्या खर्चात पुरेशी नसताना १८८३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणे खुद्द सावित्रीने केली. त्यातल्याच एका काशीबाईच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले, डॉक्टर केले आणि त्याला आपले कायदेशीर वारसदार केले. त्याच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला गर्भवतीच्या उपचारासाठी दहा लाख रुपये न देता आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसे महत्त्वाचा आहे का ? ज्या पुण्यात महात्मा फुले यांनी बाल प्रतिबंधक गृह निर्माण केले त्याच पुण्याची आजची अवस्था आहे.
विधवांना केशवपन करून विद्रुप केले जाईल याविरुद्ध मोहिम हाती घेतली. नाभिक बांधवांना घेऊन संप केला. हा संप पगार वाढीसाठी नव्हता, तर हा संप मिळणारा अनैतिक पैसा. आम्हाला नको हे सांगण्यासाठी होता. या संपाची दखल लंडनमधील वृत्तपत्रांनी घेतली. त्याच महिला आज ‘जय परशुराम’च्या घोषणा देत आहेत.
मग प्रश्न असा पडतो की खरंच आजच्या काळात फुले यांची जयंती साजरी करावी का ? जातीधर्माच्या नावाखाली आज सर्रास दंगली होत आहेत. मंदिर मज्जिद बांधण्याची प्रत्येकाची धडपड सुरू आहे. माणसाची जात कोणती यावरून माणूस ओळखला जातो. खरेतर फुलेंचा विचार त्यांची स्पष्ट वक्ता, भाषा आणि समाजात एकोपा व्हावा यासाठी असणारी तळमळ ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. त्यांनी दिलेल्या समतेचा विचार हा अंधश्रद्धेवर आधारित नसून तो सत्यवर्तनावर आधारित आहे.
सत्यशोधक धर्म म्हणजे सर्वधर्मसमभाव नव्हे तर सर्वधर्माची विश्लेषण असा अभिप्रेत आहे. भारतीय संविधानाप्रमाणे धर्मनिरपेक्ष आहे. महात्मा फुले ही केवळ एक व्यक्तीमत्व नाही, तर ते आजच्या काळातील सजग मार्गदाता आहे. त्यांच्या विचारांनीच समाज समृद्ध होऊ शकतो प्रगत होऊ शकतो.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी समस्त सर्वच स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी जे काम केलेले आहे, त्याबाबत प्रत्येक मानवाने कृतज्ञता दाखवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कर्तव्य करणे काळाची गरज आहे. स्त्री पुरुष समानता याबाबत ज्योतिराव फुले आपल्या खंडात म्हणतात,
स्त्री पुरुष निवड नसावी l गुणे आदरावी सर्वकाळ ll
एकोणीस शतकी ग्रंथ केला सिद्ध l वाचोत प्रबुद्ध ज्योती म्हणे.
(लेखक महात्मा फुले यांचे अभ्यासक असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये महात्मा फुले यांच्यावर पीएचडी संशोधन करत आहेत)
संपर्क : 9890604137 [email protected]

Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.