पुणे | ०२.१२ | रयत समाचार
‘तुही यत्ता कंची?’ हा नामदेव ढसाळ यांच्या कवितावाचनाचा कार्यक्रम आजही का केला जातो? याचे प्रत्युत्तर गेल्या दोन दिवसांत पुण्यात मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने जणू प्रत्यक्ष दिले. साप्ताहिक साधनातर्फे एस.एम. जोशी सभागृहात आयोजित या कार्यक्रमाने प्रेक्षकांची अक्षरशः रेलचेल पाहायला मिळाली. कार्यक्रम सुरू होण्याआधीच सभागृह खचाखच भरले आणि अतिरिक्त जागा संपल्यावर तर अनेकांना उभ्याने कार्यक्रम पाहावा लागला.
या सांस्कृतिक हस्तक्षेपाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा सेन्सॉर बोर्डाने एका चित्रपटाच्या संदर्भात ‘कोण नामदेव ढसाळ?’ असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देण्यासाठी, त्यांच्या कवितेची ताकद, आवाज आणि बंडखोरी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला. पहिला कार्यक्रम केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये झाला, तेव्हा एवढा भारलेला प्रतिसाद मिळेल, आणि हा उपक्रम पुढे असेल, असे आयोजकांना वाटलेही नव्हते.
या उपक्रमाचा खरा सूत्रधार म्हणजे ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते. त्यांच्याच संकल्पनेतून ‘तुही यत्ता कंची?’ हे कवितावाचन ‘ऑरगॅनिकली’ आकारले. कोणत्याही स्क्रिप्टचा बंधनकारक चौकट न ठेवता, सर्वांना जोडणारा हा मोकळाढाकळा, पण प्रभावी प्रयोग दरवेळी प्रेक्षकांना भावनिक आणि विचाराने हलवून सोडतो.
सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती संभाजी भगत, नीरजा, दीपक राज्याध्यक्ष, चिन्मयी सुमित, अक्षय शिंपी, हेमंत ढोमे, कैलास वाघमारे आदी कलाकारांनीही वेळ काढून स्वेच्छेने सहभाग घेतला. ‘माणूस भंगारात जाऊ नये म्हणून’ हा सगळ्यांचा एकच ध्यास.
या कार्यक्रमात तरुणाईचाही मोठा सहभाग दिसला. नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा करिष्मा, शब्दांची आग आणि त्यातील प्रतिकारशक्ती नव्या पिढीला भिडली. कार्यक्रमादरम्यान ढसाळ यांची ओळ ‘कालच तो गुहेच्या तोंडाशी ठेवून गेला पिसाळलेला जाळ, मी शिलगावीत जाणार आहे यापुढचा काळ’ वाचली गेली, तेव्हा संपूर्ण सभागृहात एकच लढाऊ ऊर्जा संचारली.
कार्यक्रमाचे आयोजन करणारे विनोद शिरसाठ यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपस्थित कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी जाहीर कृतज्ञता व्यक्त केली. अखेर ‘तुही यत्ता कंची?’ हा फक्त कवितावाचनाचा कार्यक्रम नाही, तर सामाजिक जागृती, सांस्कृतिक प्रतिकार आणि मानवी संवेदनांचा एक जिवंत उत्सव बनला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
