अहमदनगर | ०५ ऑगस्ट | प्रतिनिधी
दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने कोतवाली पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित अन्यायकारक कारवाईचा निषेध व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन त्यांना औपचारिक निवेदन सादर करण्यात आले. फटाका व्यवसायिक रामचंद्र मुलतानी यांचा फटाक्यांचा माल कोतवाली पोलिसांनी नुकताच जप्त केला होता. या प्रकरणाविरोधात असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्ष गणेश परभणे, सचिव श्रीनिवास बोज्जा, उपाध्यक्ष सुरेश जाधव व विकास पटवेकर, तसेच ज्येष्ठ सदस्य देविदास ढवळे, शिरीष चंगेडे, अनिल टकले, निखिल परभणे, अरविंद साठे, सोमा रोकडे, सागर जाधव, रमेश बनकर, दाजी गारकर, सागर हरबा, अरविंद काळे, मयूर भापकर, संजय जंजाळे, उबेद खान, आदिनाथ दारकुंडे, संजय सुराणा, अमोल तोडकर, सुनील पोपटाणी, विजय मुनोत, राजेंद्र छल्लाणी, उमेश क्षीरसागर, सुनील आरे, गोरख खंदारे, कराळे आदी सदस्य या वेळी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, फटाका वाहतूक करण्यासाठी भारत सरकारच्या स्फोटक पदार्थ नियम १९८३ च्या पोटनियम ३२(५) व ७७(२) नुसार कोणत्याही वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही. तरीही, कोतवाली पोलिसांनी वाहतुकीदरम्यान परवाना नसल्याच्या कारणावरून कारवाई करत माल जप्त केला. व्यापाऱ्यांच्या मते, ही कारवाई नियमबाह्य असून व्यवसायावर अन्याय करणारी आहे.
अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही घडल्याची व्यापाऱ्यांची तक्रार असून, काही पोलीस अधिकाऱ्यांनी आर्थिक कारणांमुळे व्यापाऱ्यांना अडचणीत आणल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा घटनांमुळे व्यवसायात अडथळा निर्माण होत असून हा त्रास दिवसेंदिवस वाढतो आहे.
या पार्श्वभूमीवर, असोसिएशनने एकत्र येत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी व्यापाऱ्यांच्या भावना समजून घेत योग्य ती कारवाई न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, व्यापाऱ्यांनी सुद्धा सर्व कायदेशीर नियमांचे काटेकोर पालन करण्याचे वचन दिले. या निवेदनाची एक प्रत जिल्हाधिकारी यांनाही सुपूर्द करण्यात आली.
