ग्रंथपरिचय | २८ जानेवारी | प्रतिनिधी
(book review) ‘आदिवासी मराठी साहित्य : स्वरूप आणि समस्या’ या पुस्तकात आदिवासींची आदिमता, त्यांच्या भाषा, त्यांच्या लोककला व लोकसाहित्य, त्याचे सामाजिक जीवन आणि समकालीन मराठी आदिवासी साहित्याचा चिकित्सक आढावा व त्या संदर्भातील प्रश्न यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या अस्तित्वाबद्दलचे आणि विस्थापनाबद्दलचे सांस्कृतिक प्रश्न कोणते याचीही चर्चा आहे. सरकारी धोरण, सरकारी योजना आणि नक्षलवादसारख्या समस्या यांचा आदिवासी साहित्याशी कसा थेट संबंध आहे? याची त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्ते व पत्रकार यांनी केलेली चर्चा.
(book review) आदिवासी या शब्दाचा वापर सर्वप्रथम भारताच्या घटना समितीचे सदस्य जयपालसिंग यांनी छोटा नागपूरमध्ये प्रचलित केला. राज्यघटनेत आदिवासींचा समावेश ‘अनुसूचित जमाती’मध्ये केला आहे. आदिवासींना ‘प्रिमिटिव्ह’ म्हणजे आदिम समजले जाते. त्यांना ‘मूळ निवासी’ संबोधले जाते. इंग्रजीतील ‘इंडिजिनस’ किंवा ‘ॲबारिजिनीझ’ या जागतिक संज्ञा मान्यताप्राप्त आहेत. आदिवासींना ‘वनवासी’ संबोधणे हा विषमतावाद आहे. ते अवमूल्यन आहे. त्यामागील वर्णवादी प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक सांस्कृतिक राजकारण समजून घेणे.

जगातील आदिवासींचे वंश, जीवनशैली, परंपरा वेगवेगळया असल्या तरी ‘आदिमता’ हे तत्त्व समान आहे. या आदिमतेचे स्वरूप कसे आहे? ती कशी प्रकट होते? आदिमतेचे मूलबंध कोणते आहेत? याचा शोध घेणे. या आदिमतेचा समकालीन आदिवासी कोणता अनुबंध आहे, हे समजून घेणे. या प्रश्नांच्या उत्तरातूनच आदिवासी साहित्याची खरी आणि मौलिक प्रेरणा कोणती याचे उत्तर मिळू शकते. आदिवासींची आदिमता हा केवळ त्यांच्या अस्मितेचा भाग नसून आदिवासींच्या कोणत्याही प्रकारच्या नवनिर्मितीचा मूलस़्त्रोत कसा आहे, हे समजून घेणे.
आदिवासींच्या सांस्कृतिक आणि भौतिक अस्तित्वाच्या संदर्भात ‘भाषा’ हा कळीचा मुद्दा आहे. युनेस्को ज्या तीन हजार मरणासन्न भाषांबद्दल सांगत आहे, त्यात सर्वाधिक आदिवासी भाषा आहेत. भारतात भाषिक तत्त्वावरील राज्य विभाजनाचे कोणते दूरगामी परिणाम झाले? दोन प्रांतांच्या सीमांवरील आदिवासींचे भाषिक अस्तित्व कोणते?
(book review) १९९१ च्या जनगणनेनुसार गोंडी भाषा बोलणारांची संख्या सुमारे वीस लाख आहे. माडिया भाषा एक लाख लोक बोलतात. कोरकू आणि मुंडा, भाषा बोलणारे साडे चार लाख आदिवासी आहेत. मुंडारी, संथाली, पावरा, कुई, तुलू, मणीपुरी, त्रिपुरी आणि सावरा या आदिवासी बोली एक लाख ते आठ लाख संख्येच्या दरम्यान आहेत. साहित्यासाठी लिपीची गरज असते का? लिपी महत्त्वाची की ती भाषा बालणारे लोक महत्त्वाचे? त्यांच्या भावना, संवेदना, कल्पना, स्वप्ने, सुखदुःख यांना काय स्थान आहे?
मुख्य धारेतील भारतीय साहित्यात आदिवासी साहित्याला काय स्थान आहे? त्या साहित्यात आदिवासींना काय स्थान आहे? साहित्याच्या किंवा भाषेच्या अभिजाततेचा आदिवासी साहित्याशी-भाषांशी काय संबंध आहे?
आदिवासी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या? मराठीतील दलित आणि ग्रामीण साहित्याशी आणि त्यांच्या चळवळीशी आदिवासी साहित्याशी संबंध कसा आहे? वर्ण-जाती-अस्पृश्यता व्यवस्थेविरूद्धच्या विद्रोहाशी आदिवासी साहित्याचा संबंध काय आहे? मध्ययुगीन इतिहासातील आदिवासींच्या पराक्रमी व समृद्ध राजवटींचा आदिवासी साहित्याशी कोणता अनुबंध असू शकतो?
आर्य-अनार्य संघर्षाचा आदिवासी संस्कृतीशी काय संबंध आहे? रामायण-महाभारत आणि रावणाचा आणि आदिवासी साहित्याचा काय संबंध आहे? भारतातील विविध वसाहतींच्या कालखंडातील आदिवासींच्या संघर्षाचा समकालीन संदर्भ कसा आहे?
आदिवासींबद्दल वर्तमान राजकीय धोरणाला समकालीन आदिवासी साहित्य कसे स्वीकारते किंवा नकार देते? आदिवासींना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, म्हणजे काय? मुख्य प्रवाह कोणाचा? आदिवासींचा प्रवाह मुख्य का नाही? महाशक्ती, महानगर, स्मार्टसिटी या रूपातील तथाकथित विकासाला आदिवासी साहित्य कसे सामोरे जाते? रंजनवाद, उपभोगवाद आणि पलायणवाद यांना आजचे आदिवासी साहित्य केसी तोंड देते? आदिवासी साहित्याची सामर्थ्यस्थळे कोणती? मर्यादा कोणत्या आणि भवितव्य काय?
‘आदिवासी मराठी साहित्य : स्वरूप आणि समस्या’
संपादन : डॉ. प्रमोद मुनघाटे
प्रकाशक : भाषाविकास संशोधन संस्था, कोल्हापूर
पुस्तकाचा आकार : १/ ८ डेमी / पृष्ठ १९२ / नॅचरल शेड पेपर / मजबूत शिलाई बांधणी/ पुठ्ठा कव्हर
मूल्य : ३४०/- सवलत किंमत : २७०/-
संपर्क : ९८२३११८३०० / ७३८५५८८३३५
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.