अहमदनगर | १२ एप्रिल | प्रतिनिधी
(Art) भाषण करणे ही सुंदर कला आहे. मात्र ही कला आत्मसात करण्यासाठी आधी खूप चांगले ऐकायला शिका. भरपूर वाचन करा, आपण काय बोलणार आहोत त्याचे मनातल्या मनात चिंतन करा आणि मग भाषणाला उभे राहा, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक व विनोदी कथाकथनकार डॉ.संजय कळमकर यांनी प्रशिक्षणार्थींना दिला.
(Art) येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात बालाजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘चला शिकूया भाषण कला’ या मोफत कार्यशाळेत ते बोलत होते. प्रा.प्रसाद बेडेकर, उद्धव काळापहाड, प्रा. विजय साबळे, ध्वनी व्यवस्थापक अशोक अकोलकर, इव्हेंट मॅनेजर सागर मेहत्रे, जालिंदर शिंदे, उद्योजक संकेत पिसे, लेखक सचिन चोभे, बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष व आदर्श सरपंच ॲड.अमित आव्हाड, बालाजी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व ग्राफिक डिझायनर किरण वाकचौरे, भगवान राऊत, प्रा. रविंद्र काळे, मनिषा म्हस्के, सोमेश शिंदे, ज्ञानेश्वर आव्हाड, राकेश देवगुणे आदी यावेळी उपस्थित होते.
(Art) डॉ. कळमकर पुढे म्हणाले, आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे सुरुवातीला आम्ही गावातल्या पारावर बोलायला शिकलो. ज्यांना भाषण किंवा सूत्रसंचालन शिकायचे आहे. त्यांनी आपल्या सभोवतालचे सूक्ष्म निरीक्षण केले पाहिजे. आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचे आहे, आपल्यासमोर कोणत्या वर्गातले श्रोते आहेत, याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर भाषेचे शब्दसौंदर्य वाढवणारा शब्दसाठा तुमच्याकडे असला पाहिजे. प्रासंगिक विनोदी कोट्या व उदाहरणे द्यायला तुम्हाला पटकन सुचले पाहिजे. या सर्व गोष्टीसाठी वाचन, मनन, निरीक्षण आणि सराव या चतुसूत्रीचा वापर करावा. आपल्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या त्या बिनधास्तपणे नैसर्गिक पद्धतीने मांडल्या तर तुम्ही निश्चित चांगले वक्ते होऊ शकता. या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी काळात अहिल्यानगर शहरातून चांगले वक्ते घडतील, असा आशावाद डॉ. कळमकर यांनी व्यक्त केला.
पहिल्या सत्रात प्रा.विजय साबळे यांनी प्रशिक्षणार्थीशी संवाद साधला. ते म्हणाले, भाषण करण्यापूर्वी आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी भाषणाचा खूप सराव करा. शक्य असल्यास आरशासमोर उभे राहून बोला. सावकाश आणि विचारपूर्वक बोला. श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडवून धाडसाने बोलायला शिका. आवाजातील चढ-उताराचा अनुभवानुसार योग्य तो वापर करा. विशिष्ट ठिकाणी विराम घ्या. स्वतःमधील आत्मविश्वास वाढवा. असे सांगून आपण भाषण व सूत्रसंचालन करायला कसे शिकलो, विविध प्राणी, अभिनेते व लोकप्रतिनिधींचे हुबेहूब आवाज काढायला कसे शिकलो आणि एक यशस्वी डबिंग आर्टिस्ट कसे झालो असा संघर्षमय प्रवासाची त्यांनी कथन केले.
प्रा. प्रसाद बेडेकर म्हणाले, भाषण करण्यापूर्वी तुम्ही आपण कसे दिसतो, कसे बोलतो, आपल्याला मराठीत नीट बोलता येते का ? याचा विचार करा. आपलं बोलणं ऐकण्यासाठी लोकांनी थांबले पाहिजे. केवळ भाषेच्या वादात न अडकता उत्तम प्रमाणभाषा आपल्याला बोलता आली पाहिजे. आपण हे ठरवून शिकलं पाहिजे. आपले उच्चार सुधारा, नाटक, चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रम पहा, चांगली भाषा आत्मसात करा, भरपूर वाचन करा, असे त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध निवेदक उद्धव काळापाठ यांनी आवाजाचे व्यायाम भाषणाचे तंत्र आणि मंत्र व नवरस याबद्दल माहिती दिली. निवेदन कसे करू नये याबद्दल त्यांनी विनोदी शैलीत मार्गदर्शन केले आणि सरावानेच माणूस घडतो, हेही सांगितले.
बालाजी फाउंडेशनच्या वतीने यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आगामी काळात लवकरच मोठी कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मान्यवरांच्या हस्ते माईकला पुष्पहार घालून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
भगवान राऊत यांनी प्रास्ताविक, जावेद सय्यद यांनी सूत्रसंचालन तर चेतन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा काळे, शिवानी शिंगवी, आशिष कांडेकर, राम काळापहाड, आदित्य सोनवणे, ॲड. सचिन चंदनशिव यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.