ता.११ व १२ जानेवारी २०२५ रोजी अकोला येथे साहित्य संमेलन संपन्न होणार
अकोला | २१ डिसेंबर | प्रतिनिधी
(Religion) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन ता.११ व १२ जानेवारी २०२५ रोजी अकोला येथे संपन्न होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध कीर्तनकार आणि संवेदनशील कवी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची तर स्वागताध्यक्षपदी श्री गुरुदेव सेवा मंडळ युवा कार्यकर्ते मंगेशदादा कराळे यांची निवड झाली, अशी माहिती रामेश्वर बरगत यांनी दिली.
(Religion) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे गेल्या ११ वर्षांपासून आयोजन केले जात असून यात राष्ट्रसंताच्या साहित्यातील अध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय, साहित्यिक भूमिकांचे चिंतन होते. या संमेलनात साहित्य क्षेत्रातील विचारवंत सहभागी होतात. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिकाची निवड केली जाते. या वर्षी ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
शामसुंदर महाराज हे ज्येष्ठ पत्रकार असून संमेलनशील कवी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या अनेक कवितांचे संदर्भ अनेक वक्त्यांच्या भाषणात उल्लेखिले तातात. त्यांच्या तीन कवितांचे वाचन विधानसभेत वेगवेगळ्या आमदारांनी केले असून कवितेच्या रूपाने त्यांच्या विचारांची नोंद विधिमंडळाच्या रेकॉर्डमध्ये झाली आहे. साहित्यक्षेत्रातील योगदानाबरोबरच पत्रकार म्हणूनही त्यांनी सामना, लोकमत, प्रहार या दैनिकात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
कीर्तन परंपरेला सामाजिक भान देण्यात त्यांचे मोलाचे योगदान असून शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल विविध माध्यमांनी घेतलेली आहे. संत साहित्य आणि संविधान यांच्यातील परस्पर पुरकता अधोरेखित करणारे संविधान कीर्तन त्यांनी प्रचलित केले आहे. शिवाय पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये संविधान समता दिंडीच्या माध्यमांतून ते प्रबोधन करतात.
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या सामाजिक, साहित्यिक, अध्यात्मिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आल्याचे रामेश्वर बरगत यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा