‘शालेय विद्यार्थी बुध्दिबळ स्पर्धा’ क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण
मुंबई | ५ डिसेंबर | गुरुदत्त वाकदेकर
Mumbai News राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने ‘कबड्डीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं.द.आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबरपासून व्यवसायिक पुरुष अ’ गट, स्थानिक पुरुष अ’ गट आणि महिला गटाच्या स्पर्धांना, संध्याकाळी ६ वाजल्यापासून आरंभ होत आहे.
Mumbai News राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या कबड्डीच्या तीन विभागात खेळविल्या जाणार्या सामान्यांमध्ये सुमारे ४८ नामवंत संघ खेळणार आहेत. क्रीडा महोत्सवात रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रो-कबड्डीतील डावखुर्या खेळाडूंचा रंजक खेळ पाहावयाला मिळणार आहे. क्रीडा सामने ९,१०,११ डिसेंबर तर अंतिम सामने त्याच क्रीडांगणावर १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडतील.
आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धा
गं.द.आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा श्रमिक जिमखाना येथे ८ डिसेंबर पासून दिवसभर होतील. जवळपास २४ नामवंत संघ या क्रीडा महोत्सवात उतरतील आणि सर्व सामने बाद पध्दतीने खेळविले जातील. मुंबई शुटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत, संघटक अशोक चव्हाण या स्पर्धांचे व्यवस्थापन पहाणार आहेत. क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्पर्धा पार पडत आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे आणि सर्व संघटन सेक्रेटरी तसेच प्रकाश भोसले, अनिल पाटील आदी हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.
येत्या ७ डिसेंबरपासून राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे शालेय १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी, आयडियल स्पोर्ट क्लब अकादमीच्या सहकार्याने लिलाधर चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली भव्य बुध्दिबळ स्पर्धा पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धा या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे, असे प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कळवले आहे.