Ahmednagar Politics: केवळ संग्राम जगताप यांना विरोध म्हणून तुम्हाला मतदान करायचं का ? पब्लिकचा काय आहे सूर - Rayat Samachar

Ahmednagar Politics: केवळ संग्राम जगताप यांना विरोध म्हणून तुम्हाला मतदान करायचं का ? पब्लिकचा काय आहे सूर

रयत समाचार वृत्तसेवा
75 / 100

ग्यानबाची मेख | २ नोव्हेंबर

Ahmednagar Politics नगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यात प्रामुख्याने लढत होणार असल्याचा अंदाज असून प्रचार मोहिम आणि कार्यकर्ता संघटन यामध्ये जगताप हे पुढे असल्याचे आज रोजी तरी दिसून येते. केवळ संग्राम जगताप यांच्यावर टीका हा एकमेव अजेंडा घेऊन विरोधक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असले तरी जगताप यांच्यावर टीका करण्यापलीकडे इतर कुठलाही सकारात्मक कार्यक्रम सध्या विरोधकांकडे दिसून येत नाही.

आमदार जगताप यांच्या विकासकामांशी संबंधित अनेक गोष्टी विरोधकांनी उचलून धरायला हव्यात मात्र विरोधकांमध्ये सध्या तितका आक्रमकपणा दिसत नाही की त्यांना याची समज नाही?

मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, भ्रष्ट आणि अपयशी महानगरपालिका सेवा, उद्यानांचा प्रश्न, शहर हद्दीतील ओपनस्पेसची अतिक्रमणे, पथदिव्यांचा प्रश्न, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न, शहरात सातत्याने होत असलेली वाहतूक कोंडी, पावसाळ्यात नागरिकांच्या घरात शिरणारे पाणी, उड्डाणपुलावरील अपघात, प्लॉटवर होत असलेली ताबेमारी असे असंख्य प्रश्न नगरकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत, मात्र त्याविषयी एकही विरोधक प्रश्न विचारण्यास देखील तयार नाही.

आमदार जगताप यांनी महापालिका प्रशासनातच अधिक लक्ष दिले त्यामुळे अनेक प्रभागांवर देखील अन्याय झालेला आहे, असे नगरसेवक व अधिकारी खाजगीत बोलतात. आपण नक्की आमदार निवडला होता की महापौर असा प्रश्न नगरकरांच्या मनात आहे, मात्र त्याचेही भांडवल करण्यात विरोधक अपयशी ठरत आहेत. दुसरीकडे विरोधकांमधील विस्कळीत असलेले संघटन ही संग्राम जगताप यांच्या जमेची बाजू आहे. जगताप कुटुंबियांचा सक्रिय राजकारणाशी असलेला प्रदीर्घ संबंध आणि त्यांनी ‘बनवलेले’ कार्यकर्त्यांचे जाळे आज रोजी विरोधकांकडे दिसून येत नाही.

आमदार जगताप यांना घेरण्यासाठी असंख्य असे विषय सध्या विरोधकांकडे आहेत मात्र विरोधकांमध्ये तितकी आक्रमकता दिसून येत नसल्याने केवळ संग्राम जगताप यांना विरोध म्हणून नवीन उमेदवाराला मत द्यायचे का ? असा प्रश्न मतदारांपुढे उपस्थित झालेला आहे.

‘सकारात्मक राजकारण नागरिक अधिक काळ स्वीकारतात त्या तुलनेत नकारात्मक राजकारणाला फारसे आयुष्य नसते’ याचा अंदाज घेऊन निदान आता तरी विरोधकांनी संग्राम जगताप यांना पर्याय म्हणून आपण निवडून आल्यानंतर काय करू हे किमान अहमदनगरकर मतदारांसमोर सांगण्याचे धाडस दाखवायला हवे, अन्यथा महाविकास आघाडीसाठी पुढील परिस्थिती अवघड आहे.

हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
Ahmednagar Politics
जनहितार्थ जारी
Share This Article
Leave a comment