Public Issue राहुरी शहर हद्दीलगतच्या तनपुरेवाडी येथे अशोक गाडेकर यांच्या वस्तीवरील कुत्र्याला बिबट्याने ठार मारले. रात्रीच्या वेळी सुमारे एक ते दीड वाजता कुत्र्याने आवाज केला म्हणून गाडेकरांना जाग आली. त्यांनी पाहिले असता आपल्या कुत्र्याला बिबट्याने धरून ओढत नेले होते. अशोक गाडेकर बाहेर शेडमधे झोपले होते. आज या कुत्र्याने अशोक गाडेकर यांचे प्राण वाचवले, गाडेकरांवरील संकट टळले, अशी परिसरातील नागरिकांमधे चर्चा आहे.
वनविभागाने तनपुरेवाडी शिवारामध्ये लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. तनपुरेवाडी भागामध्ये मोलमजुरी करणारे कामगार, शेतकरीवर्ग यांच्या जीविताला धोका असून ही मादी जातीची बिबट असण्याची शक्यता आहे, अशी लोकांमधे चर्चा होती.
दिवाळीच्या दिवशी कुत्र्यावर हल्ला झाला आणि गाडेकरही बाहेर झोपलेले असताना त्यांच्यासुद्धा जीवाला धोका होता. आज कुत्र्यामुळे त्यांचा जीव वाचला तरी वन विभागाने पिंजरा तात्काळ लावावा.