cultural politics: झुंडशाहीला निर्भयपणे आव्हान देणाऱ्या रयत संस्थेच्या डॉ.आहेर यांना न्याय द्या; अध्यक्ष शरद पवारांना आवाहन - Rayat Samachar

cultural politics: झुंडशाहीला निर्भयपणे आव्हान देणाऱ्या रयत संस्थेच्या डॉ.आहेर यांना न्याय द्या; अध्यक्ष शरद पवारांना आवाहन

रयत समाचार वृत्तसेवा
77 / 100

पुणे | ११ ऑगस्ट | प्रतिनिधी

cultural politics कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा उल्लेख केला म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या पाचवड, सातारा येथील यशवंत महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.मृणालिनी आहेर यांच्यावर मनमानी पद्धतीने स्थानिक पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांनी गुन्हा दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ.आहेर यांच्यावरील गुन्हे रद्द करत पोलीस उपनिरीक्षक गर्जे यांच्याविरुद्ध ताशेरे ओढले. परंतु याच प्रकरणात स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनाने डॉ.आहेर यांची पाचवड येथील महाविद्यालयातून बदली करत त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात न्यायालयीन न्यायनिर्णय प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर रयतच्या प्रशासनाने डॉ.आहेर यांच्यावर केलेला अन्याय रयतचे अध्यक्ष आणि फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे अभिमानपूर्वक उल्लेख करणारे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी डॉ.आहेर यांच्यावरील हा अन्याय दूर करत, त्यांची सन्मानपूर्वक मूळ महाविद्यालयात पूर्ववत नेमणूक करावी, अशी मागणी सलोखा संपर्क गटाने आयोजित केलेल्या डॉ.आहेर आणि डॉ.तेजस्विनी देसाई यांच्या सत्कार सभेने ठरावाद्वारे एकमताने केली. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य होते.

पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथील नाथ पै सभागृहात आयोजित केलेल्या सभेत धर्मांध झुंडशाहीविरुद्ध ठामपणे संघर्ष करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रा.डॉ.तेजस्विनी देसाई आणि साताऱ्यातील प्रा.डॉ.मृणालिनी आहेर यांचा डॉ.मेघा पानसरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेचे अध्यक्ष नितीन वैद्य यांनी आपल्या भाषणात कोल्हापूर येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेच्या प्राध्यापिका डॉ.तेजस्विनी देसाई आणि साताऱ्याजवळील पाचवड येथील रयत यशवंत महाविद्यालयातील प्रा.डॉ.मृणालिनी आहेर यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या झुंडशाही विरुद्ध केलेल्या संघर्षाचा गौरव केला. देशातील शिक्षणक्षेत्रात हिंदुत्ववादी संघटनांनी सुरू केलेल्या आक्रमक मोहिमेचा गंभीर धोका पुढे मांडला. या पार्श्वभूमीवर फुले, शाहू, आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा, सर्वधर्मसमभावाचा वैचारिक वारसा जपण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत डॉ.आहेर यांच्यासारख्या पुरोगामी मूल्यांचा निर्भीडपणे पुरस्कार करणाऱ्या प्राध्यापिकेवर अन्याय होणे ही त्या संस्थेलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. नितीन वैद्य यांनी डॉ.आहेर यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी शरद पवार यांनी त्वरित कारवाई करावी, असे आवाहन केले.

याप्रसंगी डॉ.देसाई आणि डॉ.आहेर यांना ‘विवेकाचा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ.देसाई आणि डॉ.आहेर यांनी त्यांच्याविरुद्ध धर्मांध संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या उन्मादी आक्रमणाला कशा पद्धतीने दीर्घकाळ तोंड दिले, याविषयी सविस्तर अनुभव कथन केले.
डॉ.देसाईंनी आपण कोल्हापुर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात वर्गावर शिकवत असताना काही विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना न देता वर्गातील संवाद मोबाईलद्वारे रेकॉर्ड करून, तो वादग्रस्त ठरेल अशा पद्धतीने संपादित करून व्हायरल केला. त्याआधारे कोल्हापुरात आपल्या विरुद्ध मोठा असंतोष निर्माण केला. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या हुल्लडबाज झुंडीने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर दबाव आणत माझ्याकडून माफी मागण्यात यावी, असा आग्रह धरला. या झुंडशाहीला शरण जात महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि व्यवस्थापनाने हुल्लडबाजी करणाऱ्यांची मी माफी मागावी असा आग्रह धरला. मी या दबावाला बळी न पडता माझ्या भूमिकेशी ठाम राहिले. म्हणून मला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. मी माझ्या भूमिकेशी ठाम राहिले. या माझ्या संघर्षात माझे पती, कुटुंबीय आणि कोल्हापुरातील लोकशाहीवादी नागरिक, स्त्री संघटना पुरोगामी संघटना माझ्या पाठीशी होते, ही मोठी दिलासादायक गोष्ट आहे. ‘स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबाचा वारसा असलेल्या डॉ.देसाई यांनी आजच्या तरुणांमध्ये जाणीवपूर्वक विचारशून्यता आणि अविवेकी दृष्टिकोन कसा वाढवला जात आहे हे दाखवून दिले.

डॉ.आहेर यांनीही त्यांच्यावर बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी तरुणांनी कशाप्रकारे दबाव आणला याचे अनुभव कथन केले. त्यांनी स्थानिक पोलीस यंत्रणेने धर्मांध झुंडीला पोषक भूमिका घेतली याची सविस्तर माहिती दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासक मंडळानेही झुंडशाहीच्या दबावाखाली आपल्यावर दोन वेळा बदलीची कारवाई केली, याचा उल्लेख केला. आजही डॉ.आहेर यांना त्यांच्या मूळ महाविद्यालयात पुन्हा नेमणुक देण्यात आलेली नाही.

VIRAJ TRAVELS
Ad image

सभेच्या प्रमुख पाहुण्या डॉ.मेघा पानसरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत विविध मार्गाने हिंदुत्ववादी मूल्ये विद्यार्थ्यांवर लादली जात आहेत, याचा उल्लेख करत भारतात विविध हिंदुत्ववादी विचारांच्या लहान मोठ्या संघटना कशा पद्धतीने शैक्षणिक अभ्यासक्रमात चिकित्सक विचार पद्धत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेचा, सर्वधर्मसमभावाचा विचार मोडून काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, याविषयी अनेक उदाहरणे मांडली. या वातावरणात विवेकवादी विचारांचा पुन्हा एकदा एल्गार पुकारण्याची गरज त्यांनी मांडली. आजच्या परिस्थितीत भारतीय घटनेतील मूलभूत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुशिक्षित वर्गाने एकत्र येऊन या एकांगी हिंदुत्ववादी विचार प्रवाहचा निर्भीडपणे, लोकशाही मार्गाने प्रतिवाद करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. ‘सन्मान विवेकाचा’ पुरस्काराचे यासाठी विशेष महत्त्व आहे.

सभेचे सूत्रसंचालन करताना वाझेदा मुलाणी यांनी डॉ.देसाई आणि डॉ.आहेर यांच्या संघर्षापासून प्रेरणा घेत शिक्षण क्षेत्रात सुरू झालेल्या या झुंडशाही विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील पुरोगामी प्राध्यापक व शिक्षकांनी सलोखा संवाद गट स्थापन करण्याचे आवाहन केले. सलोखा संपर्क गटाच्या वंदना पलसाने यांनी प्रास्ताविक तर जीवन इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा 

Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area

Share This Article
3 Comments