अहमदनगर | दिपक शिरसाठ | रयत समाचार
‘पत्रीसरकार’ क्रांतिसिंह नाना पाटील अध्यक्ष राहिलेल्या अखिल भारतीय किसान सभा जिल्हा शाखेची बैठक ता. ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते कॉ.दशरथ हासे होते. सुरवातीला अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय महासचिव कॉ.अतुलकुमार अंजान व अन्नपूर्णा परिवाराच्या संस्थापक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ.प्रेमाताई पुरव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्या २ वर्षातील कामकाजाचा अहवाल जिल्हा सचिव कॉ.बन्सी सातपुते यांनी मांडला. त्यावर कॉ.लक्ष्मण नवले, बापु राशिनकर, श्रीधर आदीक, गोरक्ष मोरे, भुलाबाई आदमणे, भारत अरगडे, ॲड.ज्ञानदेव शहाणे, बहिरनाथ वाकळे, रमेश नागवडे यांनी चर्चेत भागीदारी करुन किसान सभेचे काम अधिक जोमाने करण्यासाठी विविध सुचना केल्या.
शेतीमालाला हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा. हमी भावापेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करणे कायद्याने गुन्हा ठरवला जावा. कांद्याला किमान ४०००/- रु. हमी भाव द्यावा. दुधाला अनुदान नको तर गाईच्या दुधाला ४०/- रू. तर म्हशीच्या दुधाला ६०/- रू.. हमीभाव द्यावा. पिकविमा कंपन्यांच्या लाभाचे धोरण बदलावे. कापसाला येत्या हंगामात १२ हजार रूपये हमीभाव जाहीर करावा तर सोयाबीन ७ हजार रू. दर द्यावा. कृषी निविष्ठा, बि बीयाणे, किटकनाशके जी.एस.टी मुक्त करावित आदी मागण्यांचे या बैठकीत ठराव करण्यात आले.
एकीकडे शेतीसाठी आवश्यक असणारे खते, बियाणे किटकनाशके यांची प्रचंड भाववाढ करून शेतीमालाला किरकोळ आधारभूत किंमत वाढवून सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करत असल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
शेतीहिताच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना बरोबर घेवून तीव्र संघर्ष सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी किसानसभेचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आले. पारनेरचे लढावू नेते बबनराव सालके यांची अध्यक्षपदी तर नेवाशाचे अप्पासाहेब वाबळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी प्रा.लक्ष्मण डांगेसर तर उपाध्यक्षपदी बापुराव राशिनकर व गोरक्षनाथ मोरे तर सुरेश बागुल यांची निवड करण्यात आली तर भगवानराव गायकवाड यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.
प्रा.बबनराव नवले, बहिरनाथ वाकळे, विकास गेरंगे, कैलास शेळके, बाबासाहेब सोनपुरे, सुरेश पानसरे, धोंडीभाऊ सातपुते, प्रा. बबनराव पवार, पांडुरंग शिंदे, मारुती शिंदे, येल्हूबा नवले, अशोक डुबे, लता मेंगाळ यांच्यासह २१ जणांची कार्यकारिणी व २१ जणांचे जिल्हा कौन्सील निवडण्यात आले. बैठकीचा समारोप गोरक्षनाथ काकडे यांनी करून नविन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.