अहमदनगर | किरण डहाळे
हातातील सोन्याची अंगठी नजरचुकीने कुठे ठेवली गेली; आणि सापडली नाही तर ती पुन्हा सापडेपर्यंत मन बेचैन होते आणि अशीच एखादी सोने ठेवलेली पिशवीच एखाद्या ठिकाणी विसरलो तर मग विचारायलाच नको. सोन्याचा एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पंधरा नग बँकेच्या लॉकर रुममध्ये ज्येष्ठ लॉकरधारकाकडून विसरले जातात. आणि त्यातील एकाही नगाला धक्का न लागता सर्वच्या सर्व दागिने त्या लॉकरधारकाला पुन्हा मिळतात. आजच्या काळात अविश्वसनीय वाटणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे, अहमदनगरच्या नावाजलेल्या अहमदनगर शहर सहकारी बँकेत.
या संदर्भातील सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या गुलमोहोररोड शाखेत एका ज्येष्ठ लॉकरधारकाने सोन्याच्या स्वरुपातील आपली आयुष्यभराची कमाई सुरक्षित रहावी म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली. सोन्याचे कानातले, शुध्द सोन्याचे लॉकेट, सोन्याच्या अंगठ्या या आणि इतर स्वरुपातील एकूण पंधरा सोन्याच्या दागिन्यांचा यामध्ये समावेश आहे. हे लॉकरधारक बँकेत आले, त्यांनी त्यांचे लॉकर वापरले. आणि हे करत असताना त्यांच्या सोन्याच्या काही वस्तू चुकून बाहेर टेबलवर विसरल्या. लॉकरधारक त्यांचे काम झाल्यावर निघून गेले. त्या ठिकाणी बँकेचे कर्मचारी प्रविण गुळमिरे हे गेले असता त्यांना या सोन्याच्या वस्तू सापडल्या.
या सापडलेल्या सोन्याच्या वस्तू ज्यांच्या आहेत त्यांनाच मिळाव्यात याची खात्री करण्यासाठी लॉकर रजिस्टरला केलेल्या नोंदी तपासून संबंधित लॉकरधारकास बँकेत बोलविण्यात आले. त्यांना त्यांचे लॉकर उघडून आतील वस्तुंची तपासणी करण्यास सांगितले. लॉकरधारकाने तपासणी केली असता, त्यांना त्या वस्तुंमध्ये काही वस्तू गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. तसे त्यांनी शाखाधिकारी योगेश पाठक यांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या गहाळ झालेल्या सोन्याच्या वस्तू आणि प्रविण गुळमिरे यांना सापडलेल्या वस्तू यांची पडताळणी करण्यात आली. त्यांनी सांगितलेल्या वर्णनाशी सापडलेल्या वस्तुंचे वर्णन जुळत असल्याने, सापडलेले सोन्याचे दागिने त्याच लॉकरधारकाचे असल्याचे बँकेची खात्री पटली व त्यानंतर त्या वस्तु त्या लॉकरधारकाच्या ताब्यात देण्यात आल्या.
या सर्व प्रक्रियेनंतर संबंधित लॉकरधारकाने शहर बँकेचे कर्मचारी प्रविण गुळमिरे यांचे मनोमन आभार मानले. शहर बँकेमुळे आमचे सोने आम्हाला मिळाले व त्याबद्दल आम्ही बँकेचे ऋणी आहोत अशी प्रतिक्रिया संबंधित लॉकरधारकाने व्यक्त केली.
प्रविण गुळमिरे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना, चेअरमन सीए. गिरीश घैसास यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गौरवोद्गार काढून प्रामाणिक कर्मचारी हे बँकेचे बॅण्ड ॲम्बेसिडर असतात. अहमदनगर शहर सहकारी बँकेने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्कृष्ट व प्रामाणिक सेवा दिलेली आहे. ही परंपरा बँकेचे कर्मचारी पुढे चालवित आहे याचा निश्चित अभिमान आहे असे प्रतिपादन केले.
सत्कारप्रसंगी बँकेचे व्हा. चेअरमन डॉ. भूषण अनभुले, ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा, संचालक अशोक कानडे, संजय घुले, डॉ. विजयकुमार भंडारी, सुजित बेडेकर, जयंत येलूलकर, प्रा. माणिक विधाते, प्रदिपकुमार जाधव, दत्तात्रय रासकोंडा, संचालिका रेश्मा आठरे- चव्हाण, स्वाती कांबळे, सेवक प्रतिनिधी संतोष मखरे, राजेंद्र गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे, वरिष्ठ अधिकारी दिनेश लोखंडे, प्रकाश वैरागर, संजय मुळे आदि उपस्थित होते. प्रविण गुळमिरे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल गुलमोहोर रोड शाखेचे लॉकरधारक, खातेदार, ग्राहक व बँकेच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.