(Agriculture) तालुक्यातील जवळा गावातील नांदणी नदीने यावर्षी एक ऐतिहासिक दृश्य निर्माण केले. मे महिन्यात सलग आठ-दहा दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदणी नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे पाहायला मिळाले. गावातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांच्या इतिहासात उन्हाळ्यात विशेषतः मे महिन्यात अशा प्रकारे नदीत पाणी वाहिल्याचे दृश्य यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नव्हते.
(Agriculture) या अनपेक्षित पावसामुळे संपूर्ण परिसरात उत्सुकता वाढली असून लहानथोर सर्वजण नदी पाहण्यासाठी जमा झाले. नद्यांप्रमाणेच परिसरातील नालेही भरून वाहू लागले आहेत. मागील वर्षी कमी पावसामुळे बरेचसे विहिरी आणि बोअरवेल्स कोरडे पडले होते. त्यामुळे फळपीक उत्पादक व ऊस शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
(Agriculture) यंदा मात्र अवकाळी पावसाने संपूर्ण चित्रच पालटले. शेतकऱ्यांनी कष्टाने उभे केलेली उन्हाळी पिके, आणि साठवलेले धान्य या पावसामुळे भिजले. अनेक घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काही भागांत पशुधनही गमवावे लागले.
उन्हाळ्यातील मे महिन्यात इतका पाऊस पूर्वी कधीही न झाल्याचे स्थानिक बुजुर्ग व्यक्ती सांगतात. अवकाळीमुळे वीज कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून मृत्यूची नोंद आहे.
परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करण्याची आणि नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी केली आहे.