सरकारी दरबारी प्रयत्न केल्यास जागेला मुदतवाढ निश्चितच मिळू शकेल
बेळगांव | १५ जानेवारी | श्रीकांत काकतीकर
(agriculture) नोव्हेंबरपासून सुरू झालेला गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून बेळगाव जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांनी सुमारे दोन महिन्यांच्या या गळीत हंगामामध्ये १.०५ कोटी ३५ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. दरम्यान बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना यावर्षी गाळपाविना बंद राहिला. दोन वर्षांपूर्वी या कारखान्यावर नव्याने संचालक मंडळाची निवड झाली. नव्या संचालकांकडून कारखाना चांगल्या प्रकारे चालेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात होती. गेल्या वर्षी कारखान्याचे गाळप झाले, मात्र यावर्षी कारखान्याची धुराडी पेटलीच नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मार्कंडेय साखर कारखान्याचे भवितव्य अधांतरी राहिल्याचे दिसत आहे.
(agriculture) एका बाजूला सहकारी साखर कारखान्यांना विविध आणि अडचणींचा सामना करावा लागत असताना, दुसऱ्या बाजूला खाजगी सहकारी साखर कारखाने मात्र चांगले ‘चालू’ आहेत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. बेळगाव तालुक्यातील काकती जवळील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत अनेकांचे मोलाचे योगदान आहे. या कारखान्याच्या उभारणीत रामभाऊ पोद्दार, शटुपाण्णा पाटील तसेच अन्य मंडळींनी बरेच कष्ट घेतले. तालुक्यात पहिला कारखाना होणार त्यामुळे शेतकऱ्यांमधूनही मार्कंडेय साखर कारखान्याकडून बऱ्याच अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र या कारखान्याच्या उभारणीपासूनच त्या वेळच्या मंडळींना मोठ्या अडीअडचणींचा सामना करावा लागला. महत प्रयासानंतर कारखाना सुरू झाला. कारखान्याची धुराडी पेटल्यामुळे तालुक्यातील पहिला कारखाना आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली असल्याचे दिसून येत आहे. याला कारणेही विविध प्रकारची आहेत. यामध्ये कारखान्यावर असलेले कर्ज व कारखाना सुरू ठेवण्यासाठी निधीची कमतरता हेच प्रमुख कारण असल्याचे दिसून येत आहे. याच कारणामुळे यावर्षी कारखान्याचे गाळप झालेले नाही. त्यातच पुढील वर्षी कारखान्याच्या जागेची लीजही संपत आहे.
सरकारी दरबारी प्रयत्न केल्यास कारखान्याच्या जागेला मुदतवाढ निश्चितच मिळू शकेल. मात्र पुढच्यावर्षी तरी मार्कंडेयची धुराडी पेटेल का याबाबत अद्यापही उत्तर सापडत नसल्याचे जाणवते.
हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर
Contents
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.