अहमदनगर | १७ मार्च | प्रतिनिधी
(Accident) शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य अशुद्ध जलवाहिनी (७०० मिमी C.I.) दुपारी देहरे गावानजीक फुटली. या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या जलपुरवठा विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले.
(Accident) गॅस पाईपलाइनमुळे अडथळा, तत्काळ कारवाई : दुरुस्तीच्या कामादरम्यान, या जलवाहिनीवर BPCL कंपनीची गॅस पाईपलाइन आडवी टाकण्यात आल्याचे आढळून आले. यामुळे दुरुस्तीच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आणि ही आडवी गेलेली पाईपलाइन तातडीने काढण्यासाठी कंपनीला भाग पाडले.
(Accident) युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील : महानगरपालिकेच्या पथकाने यंत्रसामग्रीच्या मदतीने तुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. यासाठी विशेष तांत्रिक तज्ञ व कुशल मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रात्री उशिरापर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मनपा कर्मचारी अथक प्रयत्न करत आहेत.
पाणीपुरवठा विस्कळीत राहू शकतो, पर्यायी उपाययोजना सुरू : या तांत्रिक बिघाडामुळे शहराच्या काही भागात उद्या सकाळपर्यंत पाणीपुरवठा विस्कळीत राहू शकतो. त्यामुळे महानगरपालिकेने पर्यायी व्यवस्थेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. ज्या भागात पाणीपुरवठ्यावर अधिक परिणाम होईल, त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
महानगरपालिका प्रशासनाची नागरिकांना विनंती : महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून, नागरिकांनी संयम राखावा व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले. महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील आहे आणि लवकरच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.