Politics अमुक तमुक राजकीय पक्षाचा बालेकिल्ला, अमुक तमुक उमेदवाराचा बालेकिल्ला, उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता या निकषांच्या आधारे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटप जाहीर करण्यात आल्याचे राजकीय पक्ष व त्यांचे नेते सांगताना दिसतात. मात्र या सर्व राजकीय पक्ष व नेत्यांना मतदारांचा इशारा आहे, या देशात कोणत्याच उमेदवाराची वा कोणत्याच राजकीय पक्षाची निवडून येण्याची क्षमता असत नाही, लोकशाही व्यवस्थेत निवडून देण्याची क्षमता ही केवळ आणि केवळ मतदारांमध्येच असते त्यामुळे मतदारांना गृहीत धरणे थांबवा, असा खणखणीत इशारा कोपरगाव विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले समाजसेवक संजय काळे यांनी दिला.
माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी दुर्बिणीच्या सहाय्याने तालुक्यातील तीन हजार कोटींच्या विकासकामांचा शोध घेत असल्याने मतदारांना अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. संजय काळे म्हणाले, मतदारांनी ठरवले तर ते कोणत्याही उमेदवाराचा, कोणत्याही राजकीय पक्षाचा पराभव करू शकतात. हे अनेक वेळेला अधोरेखित झालेले आहे. ‘अगदी बलाढ्य अशा नेत्यांना देखील मतदारांनी पराभवाची धूळ चारलेली आहे, हे विसरू नका. निवडून येण्याची क्षमता हा निकष ही मतदारांची दिशाभूल ठरते, ही दिशाभूल थांबवा, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. Politics
गेल्या ५ वर्षातील सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, यांचे वर्तन लक्षात घेता कोपरगावातील मतदारांची ठाम भावना झालेली आहे की, ‘पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारणाची व कोपरगावची साफसफाई करण्याची वेळ आलेली आहे.’ मतदारांना गृहीत धरत राजकारण करणाऱ्या उमेदवारांना घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. मतदारांना ज्ञात आहे की, टाकीतून शुद्ध पाणी हवं असेल तर त्या टाकीत साचलेली घाण संपूर्णपणे साफ करावी लागते. अन्यथा त्या टाकीत कितीही शुद्ध पाणी टाकले तरी ते अशुद्ध होणारच. कोपरगावच्या राजकारणाची साफसफाई करण्यासाठी आता मतदारांना निर्णय घेऊन गृहीत धरणाऱ्यांना घरी पाठवावे लागेल. कोपरगाव मतदार संघ हा कोणाची जहागिरी असूच शकत नाही. त्यामुळे मतदारांना गृहीत धरणे थांबवा असे शेवटी संजय काळे यांनी निक्षून सांगितले.
दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचे काम चांगले आणि प्रामाणिक आहे यात शंका नाही.संजय काळे यांनी आजवर कोपरगाव मतदारसंघातील अनेक ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवून त्यांना तडीस नेण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने तालुक्यातील पाटपाणी, नगर मनमाड रोड, वृक्षारोपण, पाच नंबर साठवण तलाव, बारा वर्षे नियमित शेतमालालाबाजारभावासाठी उपोषणांची मालिका, दर रविवारी स्वच्छता मोहीम, आयटीआय कॉलेजला वीज पुरवठा, गोदावरी नदीवरील लहान पुल, मोठा पुल, उच्च न्यायालयात जनहित याचिका, शिर्डी संस्थानचे प्रश्न, शिर्डी पोलीस स्टेशन, सरकारी दवाखाना उद्घाटन, हजारो लोकांच्या नोकरीसाठी हायकोर्टामार्फत रोजगार, कोपरगाव बस स्टॅन्ड, नगरपालिकेचे सारे गोंधळ उघड केले, फसवलेले पाणीपुरवठा पाईपलाईन, पाटबंधारे साठी भिक्षा झोळी यासारख्या असंख्य ज्वलंत प्रश्नावर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून उपोषणे आंदोलने करून स्वखर्चाने काम केले. मात्र त्यांना राजसत्तेचा सोपान मतदार निर्माण करून देणार का असा सवाल निर्माण झाला आहे.
“राजकीय निरक्षर हा सर्वात वाईट निरक्षर असतो” असे जर्मन विचारवंत बर्तोल्ट ब्रेख्त याने म्हटले, हे ते उगीच नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे काम कलेले संजय काळे या उमेदवाराला जनता स्वीकारणार की नाही हा खरा प्रश्न आहे. असे झाले नाही तर जनतेच्या भाळी या संस्थानिकांचे हातपाय दाबण्याचे, चेपण्याचे गुलामीचे काम तेव्हढे उरणार आहे, असेही संजय काळे यांनी निदर्शनास आणून दिले.