शेवगाव | १२ ऑक्टोबर | मुनवर शेख
Public Issue भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे व स्वाभिमानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे यांनी शनिवार ता. १२ ‘शेवगाव पाणी योजने’चे नारळ फोडून उद्घाटन केले. “संघर्षातून आणले पाणी, श्रेय संघर्षमय जनतेचे,सजनतेनेच केले शेवगाव पाणी योजनेचे उद्घाटन” असेल संजय नांगरे यावेळी म्हणाले.
शेवगाव पाणी योजना गेल्या दोन वर्षापासून विविध राजकीय मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडली. योजनेतील ठेकेदारावर गुन्हाही दाखल झाला, परंतु विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी या पाणी योजनेच्या उद्घाटनाचे नारळ फोडण्यास सुरुवात केली. ज्या लोकप्रतिनिधींमुळे ही पाणी योजना रखडली ते लोकप्रतिनिधीही नारळ फोडण्यास मागे राहिले नाहीत, असा आरोप नांगरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, वास्तविक लोकप्रतिनिधींना पाणी योजनेचे उद्घाटन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. योजनेच्या ठेकेदारांकडून लोकप्रतिनिधींनी टोकन घेण्याच्या वादातून ही पाणी योजना गेल्या दोन वर्षापासून प्रलंबित होती, ठेकेदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतरही टोकनचा विषय संपत नसल्यामुळे अखेर विधानसभा जवळ आल्याचे पाहून लोकप्रतिनिधींनी हा विषय आटोपता घेऊन नारळ फोडले, विजयादशमीच्या मुहूर्तावर फोडलेले नारळ हे, पाणी योजना भविष्यात बंद पडू नये, याच्या संघर्षासाठी फोडलेले आहे. असे कॉम्रेड संजय नांगरे म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, आशा कर्मचारी संघटनेच्या तालुकाध्यक्ष वीना नांगरे, श्रद्धा वरे, राहुल वरे, बालिका फुंदे, सचिन शिनगारे, नितीन हुसाळे, छबू मंडलिक, समद काझी, सैफ अत्तार, मोशीम सय्यद, इरफान पठाण, अनिस खतीब, उद्धव गुजर, अनुप खोडदे, अशोक जताडे, बंटी लांडगे आदी मान्यवर उद्घाटनप्रसंग उपस्थित होते.
मालक मारुतराव घुले पाटील, सहकार महर्षी दादा पाटील राजळे, माजी मंत्री संघर्षयोध्दा बबनराव ढाकणे, दिवंगत माजी विधान परिषद अध्यक्ष बाळासाहेब भारदे, कॉम्रेड जगन्नाथ उर्फ आबासाहेब काकडे यांच्या बॅनरवर असलेल्या फोटोंमुळे तालुक्यात मोठी चर्चा झाली.