Womens Power: वनिता विश्व - डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी - Rayat Samachar

Womens Power: वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

रयत समाचार वृत्तसेवा
63 / 100

वनिता विश्व | कर्तृत्ववान महिलांची कहाणी 

डॉ. सुलभा जंजिरे पवार

 

Womens Power

- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image
- येथे जाहीरात प्रसिद्ध करण्यासाठी व्हॉटसअप करा : 8805401800 -
Ad image

आपले नाव व माहिती ?

मी डॉ.सुलभा जंजिरे पवार, स्त्रीआरोग्यतज्ञ. एम.बी.बी.एस. मी बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये केलं आणि गायनेकोलॉजी कमला नेहरू हॉस्पिटल औरंगाबाद इथून केलं. त्यावेळी माझा स्टेट रँक १२९ होता.

मेडिकलला का जावसं वाटलं ?

माझे आजोबा राघोबा तुकाराम जंजिरे हे पंडीत नेहरू जेंव्हा भुईकोट किल्ल्यात होते तेंव्हा त्याच्या सेवेकेरीत त्यांच्यासोबत होते. घरची परिस्थिती अतिशय बेताची. ते पाच भाऊ आणि तीन बहिणी होत्या. माझे दोन काका तर सालाने जात होते. वडील शिकत होते. ते ४ थी मध्ये असतांना आजोबा अगदी साध्या आजाराने गेले, म्हणजे जो आजार साध्या गोळ्यांनी बरा होऊ शकत होता. त्यावेळी आजोबा गेल्यावर वडिलांना असं वाटायचं की काहीही झाले तरी वडील जायला नको होते. तेव्हा नंतर वडील रयत शिक्षण संस्थेच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेतून आधी शिक्षक झाले आणि नंतर एमपीएससीतुन शिक्षणाधिकारी झाले. त्यांनी आधी घर पुढे आणलं. आम्हा तिघी बहिणींना डॉक्टर केले. माझी एक बहीण सरकारी नोकरी करते तर एक खाजगी प्रॅक्टिस करते आणि मी अहमदनगर इथे सुरभी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. माझ्या वडिलांनी आम्हा तिघी बहिणींना असं सांगितलं की, तुम्ही काय कमावता यापेक्षा पण हे बघा की पैशाअभावी कुणी पेशंट परत गेलं, असं नको व्हायला. तो कुणाचा तरी भाऊ, वडील, बहीण, आई असेल. वडिलांच्या जाण्याचं दुःख कदाचित त्यांच्या मनात असेल. ते म्हणतात की, असं असेल तर मला आठवायचं माझे दुःख आठवायचे.

आजच्या जीवनशैलीमध्ये किंवा डॉक्टरीपेशाच्या खर्च बघता तुम्ही असे पेशंट करू शकता का ?

नक्कीच करू शकते. कारण मी तिथे जास्तीत जास्त माझे स्किल वापरते आणि एखाद्या रुग्णाला माझी मदत झाली तर मी स्वतःला भाग्यवान समजेल.

कोविड काळातही तुम्ही खूप मदत केली असं कळलंय, त्याबद्दल सांगा …

सगळ्यांसाठी तो काळ खूप भयानक होता. तेव्हा आम्ही दोघांनी ठरवले की, आपण सेवा द्यायची. तेव्हा आम्ही आमच्याच इमारतीत दोन फ्लॅट घेतले. माझी मुलगी तेव्हा ४ वर्षांची होती आणि सासुसासरे मधुमेह आणि बीपीचे पेशंट होते. फार काही इलाज माहीत नव्हता. २ महिने तर मी खिडकीतून मुलीला फक्त बघत होते. आम्ही हॉस्पिटलमधून सरळ त्या फ्लॅटवर जायचो. खूप कठीण काळ होता. रुग्णांच्या जवळ नातेवाईक नसायचे, तेव्हा आम्ही त्यांना खाऊ घालण्यापासून काम केलीत. खूपदा असं व्हायचं की आम्ही घरी यायचो तर शेजारी दार लावून घ्यायचे तेव्हा खुप वाईट वाटायचं.

हे खरेच खूप प्रेरणादायी आहे. आता सध्याचे मुलींच्या बाबतीत. काही शब्द सारखे ऐकायला येतात pcos आणि pcod त्याबद्दल काय सांगाल?

बदलती जीवनशैली बैठी काम आणि खाण्याचे चोचले. यागोष्टी कोविड काळापासून खूप बदलल्या, म्हणजे ज्या गोष्टी कधीतरी बाहेर जाऊन खात होतो त्या आपल्या किचनमध्ये बनायला लागल्या केक, पिझ्झा यासारख्या गोष्टी कधीतरी व्हायच्या. त्या आता नेहमीच्या जेवणाचा भाग झाल्या. आपल्या लहानपणी आपण भाजी पोळीच खायचो. कधीतरी बाहेर जाणे होत असे, पण आता तसे नाही. त्यामुळे हार्मोन्स असंतुलनचे प्रमाण वाढले. मुलींमध्ये खेळाचा अभाव. पाळी अनियमित असणे. चेहऱ्यावर केस येणे. सोनोग्राफीमध्ये गाठी दिसणे, ही मुख्य लक्षणे आहेत. यासाठी रोजचे फक्त १० सूर्यनमस्कार घालणे, जंकफूड टाळणे आणि पुरेशी झोप घेणे. इतकं जरी केलं ना तरी हा आजार बरा होऊ शकतो. कारण हा लाइफस्टाइल आजार आहे.

पण काहींच्या ड्युटीच्या वेळा वेगळ्या असतात त्यांनी काय करावं?

त्यांनीही पुरेशी झोप घेऊन व्यायाम करावाच. शरीर आपलं आहे आपण आपण काळजी घ्यायला हवी.

गर्भधारणेच्या आधी काय काळजी घ्यायला हवी?

२१ नंतरच्या मुलींना सांगणं आहे की, तुम्ही सुदृढ असेल तर बाळ पण सुदृढ होईल. हा विचार करून आपली जीवनशैली बनवणे. जंकफूड टाळणे. घरातल्या गोष्टी जास्तीत जास्त खाणे. बेसिक टेस्ट करून घेणे. फॉलिक ऍसिडच्या गोळ्या कमीतकमी ३ महिन्यापासून सुरू करणे, कारण ते जेवणातून जास्त मिळत नाही. तर तुम्ही आधी त्या गोळ्या घेणे. ते शरीरात असेल तर बाळात व्यंग येण्याचं प्रमाण कमी होते.

राजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे ?

मेनोपॉज म्हणजे ‘मॅन ओ पॉज’ म्हणजे ‘पुरुष तुम्ही थांबा’ आता तिला रेस्टची गरज आहे. आपल्याला साधारण १२-१३ वर्षात पिरेड येतात आणि ४५ ते ५० च्या दरम्यान जातात. म्हणजे एक संस्था आहे, ती शरीरात कार्यरत असते. ती जेव्हा बंद पडायला येते, तेव्हा शरीरात काही बदल घडत असतात. म्हणजे सुरुवातीला रेग्युलर येणारी पाळी सहा सहा महिन्यात येवु लागते. कधी ब्लिडिंग खूप होतं तर कधी काहीच होत नाही. पाळी गेली असं कधी म्हणावं तर जेव्हा वर्षभर आपल्याला पाळी आली नाही. असं जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणू शकतो की आता ती बंद झाली.
अशावेळी काय केलं पाहिजे तर आपण स्वतःला एक गिफ्ट दिले पाहिजे. आपल्या प्रत्येक वाढदिवसाला किंवा त्या महिन्यात किंवा त्यादरम्यान आपण आपलं हेल्थ चेकअप करून घेतलं पाहिजे. स्त्रिया नेहमी विचार करतात की त्याला खर्च येतो, पण विचार करा आपल्या मैत्रिणीचा बर्थडे असतो किंवा घरातल्या कुणाचा बर्थडे असतो तर आपण त्यांना गिफ्ट देतो ना. मग असंच गिफ्ट आपण आपल्या स्वतःला का नाही देऊ शकत? यात काय करायचं तर ओटीपोटाची सोनोग्राफी, स्तनांची सोनोग्राफी आणि गर्भाच्या मुखाची सोनोग्राफी करून घ्यायला हवी. पहिले तीन वर्ष सलग जर आपण केलं, दरवर्षी पण त्यानंतर आपण दर तीन वर्षांनी एकदा केलं तरी चालतं. यातून काय होतं की आपल्याला काही आजारांची संकेत आधीच लागतो आणि आपण त्यावर इलाज सुरू करू शकतो.

डॉक्टर, आता नवरात्र येत आहेत. नवरात्र काळामध्ये आपण स्त्रियांनी आपली काय काळजी घेतली पाहिजे?

स्त्रियांच कसं आहे माहिती आहे का? नवऱ्याला उपवास असेल किंवा घरातल्या कुणाला उपवास असेल तर आपण सगळं साग्रसंगीत बनवतो. पण जेव्हा आपल्याला स्वतःला उपवास असतो तेव्हा आपण दोन वेळा चहा पिऊ थोडंसं दूध घेऊन टाकू किंवा थोडेफार काही खाऊन घेऊ असं करतो. तर तसं न करता यावर्षी घटस्थापना झाली की, आपण हा विचार करू की, मी घटस्थापना केली आहे. माझ्या घरातली मीच अन्नपूर्णा आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवतो आणि ते ताट लहान मुलांना किंवा नवऱ्याला खायला देतो तर आता ते ताट स्वतः खा. कारण तुम्ही मनाला सांगा की, माझ्या घरातली मीच अन्नपूर्णा आहे, मीच सरस्वती आहे, आणि मीच जगदंबा आहे. मग हा स्वार्थीपणा झाला का? तर हो ! पण यातला निस्वार्थ भाव सांगू का. प्रत्येक स्त्री ही घराच्या आरोग्याचा कणा असते. आपण म्हणतो पुरुष घराचा कणा असतो, पण तो आर्थिकदृष्ट्या. आरोग्यदृष्ट्या स्त्री ही घराची कणा असते. ती जर व्यवस्थित राहिली तर घर व्यवस्थित राहतं. आता आठ दिवसात आपण दसऱ्याचा आवरलं. त्या दिवसात तुम्ही जर व्यवस्थित नसता तर घर कुणी आवरलं असतं? हा विचार करायचा आणि त्यातही फळ आणि सुकामेवा पण खा, कारण शरीराची जी झीज होते, ती भरून निघाली पाहिजे. शक्यतो आपल्या घरांमध्ये या गोष्टी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी असतात आपल्यासाठी त्या नसतात. म्हणून ते नैवेद्याचं ताट आपण खायचं.

डॉक्टर, एकंदरीत स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी?

प्रत्येक स्त्रीने रोज दिवसभरातला अर्धा तास स्वतःसाठी द्यावा. एक तास वगैरे म्हणतात पण अर्धा तास दिला तरी पुरेस आहे. त्यात तुम्ही चालायला जा. तुम्ही योगा करा. जिमला जा. झुंबा करा. काहीही करा, पण तो अर्धा तास. आपल्या शरीरासाठी आपण तो दिला पाहिजे. खाण्याकडे लक्ष द्या. आपण आपली गाडी असते ना तिलाही दर तीन महिन्यांनी सर्व्हिसींगला देतो, कारण ती जास्त काळ चालते मग आपल्या शरीराच्या सर्व्हिसींगवर पण आपणच लक्ष द्यायला हवं ना. त्याचबरोबर आपल्या घरातल्या ज्या मुली आहेत त्यांना स्वयंपूर्ण बनवा. त्यांना स्वसंरक्षणाचे धडे द्या. त्यांच्या पाठीशी रहा. तू अबला नाहीये, हे तुमच्या वागण्यातूनही त्यांना दिसू द्या.
(मुलाखत – दिपाली माळी)

कृपया, वनिता विश्व वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा

हे हि वाचा : History: द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर

 

Share This Article
Leave a comment