मुंबई | २३ ऑगस्ट | गुरुदत्त वाकदेकर
जूने २९ कामगार कायदे गुंडाळताना कुणाशी चर्चा नाही की संवाद नाही. कामगार नको आहेत पण उद्योगपती हवे आहेत. केंद्र सरकारने संमत केलेले, कामगार हितविरोधी चार कोड बिल राज्यात लागू करण्याचा डाव महायुती सरकारचा politics आहे, तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा हे सरकार येणार नाही, याची काळजी कामगारवर्गाला घ्यावी लागेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलताना दिला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या विद्यमाने संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११७ वी जयंती बुधवारी परळच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली. याप्रसंगी गं.द.आंबेकर जीवनगौरव आणि श्रमगौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागतपर भाषण केले.
माथाडी कामगार कायदा दुरुस्ती विधेयक मांडणारे हे राज्य सरकार केंद्राने संमत केलेल्या चार श्रम संहिता राज्यात लागू करण्याचा मोका शोधू पाहात आहे. देशात कधी नव्हे ती बेरोजगारी नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आली आहे. सन २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांच्या पंक्तीत असेल, असे दिवास्वप्न दाखविणार्या नरेंद्र मोदी सरकारच्या फसव्या चाली विरुद्ध आता कामगार वर्गाला एकजूटीने लढावे लागेल, असे आवाहन राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ कामगार नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले, मुंबईमधील कामगारांना एक लाख ४० हजार घरे देण्याचे धाडस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविले आहे. परंतु राज्याच्या महायुती सरकारने मागील सरकारने सोडतीत लागलेल्या घरांच्या चावी वाटपा पलीकडे काहीच केलेले नाही. सरकारने सत्तेवर आल्यापासून एकाही कामगाराला नवीन घर बांधलेले नाही. यापूर्वी मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्या एनटीसीद्वारे चालविण्याचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सहानुभूतीचा निर्णय घेतला. परंतु आताचे केंद्र सरकार देशातील बंद पडलेल्या एनटीसीच्या २३ गिरण्या चालविणे आमचे काम नाही, असे म्हणून टाळाटाळ करित आहे. केंद्र सरकारने कोविडचे कारण पुढे करून चालू असलेल्या देशातील एनटीसीच्या २३ गिरण्या बंद केल्या आहेत. आम्ही या प्रश्नावर राष्ट्रीयस्तरावर लढा उभा केला.
पुरस्कार प्रदान सोहळ्यात, संघटनेने अमृत महोत्सवीवर्षाची वाटचाल पूर्ण केल्याबद्दल केंद्रीय इंटकचे अध्यक्ष डॉ.जी.संजीवा रेड्डी यांना श्रमरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते समारंभाला उपस्थित राहू शकले नाहीत.
गौरव सोहळ्यात मानाचा गं.द.आंबेकर पुरस्कार कामगार नेते भाई जगताप यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध कारखाने आणि आस्थापनातील कामगारांमधून सिन्नर येथील रिंग प्लस ऍक्वा कंपनीतील कामगार (सिटु) कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांना कामगार चळवळीतून, मुंबई येथील व्हीव्हीएफ इंडिया कंपनीतील कामगार सामाजिक क्षेत्रातील निस्पृह कार्यकर्ते दिलीप गणपत खोंड यांना सामाजिक क्षेत्रातून, नाशिक येथील पाच कथा संग्रह प्रकाशित असलेले महिंद्रा मधील कामगार लेखक विलास पंचभाई यांना साहित्यातील योगदानासाठी, मुंबई येथील सरकारी आस्थापनातील लिपीक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू नेहा मिलिंद साप्ते यांना क्रीडा क्षेत्रातून, रत्नागिरी येथील विविधांगी कलेने सुपरिचित असलेले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीतील कामगार संतोष दत्ताराम शिंदे यांना कला क्षेत्रातून आंबेकर श्रमगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कामगार नेते आमदार भाई जगताप यांचेही त्या वेळी भाषण झाले. डॉ. शरद सावंत, राजेंद्र गिरी, प्रदीप मून, काशिनाथ माटल यांनी पूरस्कार निवड समितीचे काम पाहिले. गं.द.आंबेकर जयंतीच्या औचित्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वाटचालीवर एक माहितीपूर्ण चित्रफीत प्रकाशीत करण्यात आली. याच औचित्याने इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण गिरणी कामगारांच्या मुलांचा आंबेकर स्मृती शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला. महाराष्ट्र इंटकचे दिवाकर दळवी, मुकेश तिगोटे, रामिम संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : नाथसिध्द संप्रदायातील योगपट्ट – विशाल फुटाणे
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.