अहमदनगर | तुषार सोनवणे | २९
येथील निर्भय बनोचे सदस्य तथा ॲड. श्याम आसावा यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्य व अप्पर सचिव यांना अहमदनगर मनपातील अनागोंदी, गैरकारभारसह सर्व तक्रारींची एकत्रित तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
आपल्या मागणीत त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिकेचे लाचखोर व भ्रष्टाचारी आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाच आहे. त्यामुळे पालिकेतील अनागोंदी व गैरकारभाराबाबत संबंधाने शासनाकडे प्राप्त सर्व तक्रारीची एकत्र व तातडीने चौकशी करावी तसेच पंकज जावळे यांची ज्या पद्धतीने अहमदनगर येथे आयुक्तपदी नियुक्ती झाली त्याचीच खरेतर सर्वात आधी चौकशी होण्यास हवी. त्यांची बदली करताना नगर विकास विभागाने बदली प्रस्तावत प्रतिकूल शेरा मारलेला असतानासुद्धा त्याची बदली झाली म्हणजे ते किती वजनदार असतील हे यातून समजते. तत्कालीन आयुक्त शकर गोरे यांचा कार्यकाळ संपलेला नसताना ही बदली झाली याबाबत अनेक जणांनी तक्रारी करूनही आज पावतो या तक्रारी बासनात गुंडाळून ठेवण्यात आल्या. आता तरी त्यावरील धूळ झटकून त्याबाबत कारवाई करा.
ते पुढे म्हणले, अहमदनगर येथे आयुक्त म्हणून पंकज जावळे याची बदली करण्यात येऊ नये याबाबत शेरा मारलेला असतानाही ते अहमदनगर येथे आयुक्त म्हणून आले म्हणजे नक्कीच त्यांना मोठा राजाश्रय आहेच. कदाचित या गुन्ह्यातही या राजाश्रयमुळे तसेच कायद्यांचा स्वतःच्या गैरफायदा करता कसा वापर करायचा हे त्यांना चांगलं ठाऊक असल्याने ते सहीसलामत सुटतील व तो मी नव्हेच असा आव आणतील परंतु खरोखरच जर या गुन्ह्याच्या तपास झाला तर मात्र नक्कीच महानगरपालिकेतील मोठे अर्थकारण उघड होईल पंकज जावळे यांच्या मेव्हण्याचे मालमत्त्याची सुद्धा सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
जावळेसारखा भ्रष्टाचारी व लाचखोर वरिष्ठ अधिकारी मिळाल्यानंतर त्यांच्या हाताखालील काम करणारे व त्यांचे सारखेच अवगुण असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले हात साफ करून घेत पालिकेची आर्थिक लूट केलेली आहे व नुकसानही केलेले आहे. खरंतर डिसेंबर महिन्यातीलच सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी बांधकाम परवाना व पूर्णत्वाच्या दाखल्याकरिता नगररचनाचे कर्मचारी दोन दोन लाख रुपये मागत असल्याचा आरोप करत आयुक्ताकडे कार्यवाहीची मागणी करत होते. एवढच नव्हे तर चक्क नगरसेवकांना सुद्धा नगररचना विभागात पैसे द्यावे लागल्याचे त्यावेळेस बोलले गेले. कालच्या लाचखोरीनंतर दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत एक म्हणजे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जातात व दुसरे की चाळीस चोराचे आयुक्त हेच आलीबाबा होते. बांधकाम परवानगी व भोगवटा पत्र देताना मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत आहे. काही ठेकेदार पालिकेतील अधिकाऱ्यांचे लाडके झालेले आहे की त्यांनी कामे पूर्ण केलेली नसताना त्यांना कामाची पूर्ण बिले अदा करण्यात आली. रस्त्यांच्या कामावर व गटारीच्या दुरुस्तीवर सुमारे २०० कोटी रुपयाचा खर्च होऊनही त्याच्या दुरावस्था कायम आह. रस्त्यांच्या कामाच्या दर्जा गुणवत्तेला हरताळ फासत कागदोपत्री कामे दाखवून खर्चाची बिले काढुन अक्षरशः लुटमार चालली आहे. कुठेही कामाच्या ठिकाणी त्या कामाबाबतची माहिती फलक लावलेली नाहीत, फलक लावली तर आपल्या लुटमारीची सर्वच पोलखोल होईल म्हणून घेतलेली खबरदारी व काळजी आहे. भर पावसात रस्त्यांची कामे कशी करावी याच तंत्रज्ञान अहमदनगर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारींना चांगले अवगत झाले आहे.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, ७० लाख रुपये खर्चुन महापालिकेने पोकलेन खरेदी केली. ती विनावापर ठेवली व त्यानंतर पोकलेनने होणारी कामे ही खाजगी ठेकेदाराकडूनच करून घेतली. एलईडी पथदिवे लावल्यानंतर वीज बिलात मोठी बचत होईल, असे सांगत. त्यासाठी शहरात मोठा खर्च करण्यात आला परंतु झालेल्या खर्चाच्या तुलनेत वीज बिलांमध्ये कोणतीही भरीव बचत झाली नाही. याचाच अर्थ दिशाभूल करून खर्च केला. १२ ते १४ लाख रुपये खर्च करून कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात आला परंतु तोही नादुरुस्त अभावी कित्येक महिने बंद. ३१ घंटा गाड्या अवघ्या चार वर्षात भंगारात गेल्या. शहरात सगळीकडे अनाधिकृत बांधकामे, अनाधिकृत होर्डिंगची बजबजपुरी माजलेली आहे. तीन पाणी योजनावर सुमारे ३०० कोटीचा खर्च होऊनही शहरातील अनेक भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे. मग हा पैसा गेला कुठे? कचरा डेपोतील प्रकल्प बंद असताना त्यावर वर्षाला पावणेचार कोटीची उधळपट्टी झाली.
अहमदनगरमधील गेल्या अडीच वर्षात रस्त्यांची व इतर विकासकामांमध्ये आलेला खर्च व त्या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी झाली तर मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल.
पंकज जावळे व नगररचनाचे तत्कालीन सहाय्यक संचालक राम चारठाणकर यांनी संगनमत करून अनेक शासकीय रेकॉर्ड खोटे बनवून अथवा रेकॉर्डमध्ये फेरफार करून काही हितसंबंधी लोकांना फायदा पोहोचवला अथवा हितसंबंधींना गैरफायदा होण्यासाठी खोट्या कारवाया केल्या. यात पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेचे लाचखोर व भ्रष्टाचारी आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने महानगरपालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आलाच आहे त्यामुळे पालिकेतील अनागोंदी व गैरकारभाराबाबत संबंधाने शासनाकडे प्राप्त सर्व तक्रारींची एकत्र व तातडीने चौकशी करावी, अशी लेखी मागणी ॲड. श्याम आसावा यांनी केली आहे.