पिंपरी | प्रदीप गांधलीकर | २४.६.२०२४
विश्वशांतीसाठी ज्ञानी लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी काशीधाम मंगल कार्यालय, चिंचवडगाव येथे रविवारी ता. २३ जून रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘संख्या विरुद्ध सांख्य’ या विषयावरील ५७ वे प्रवचनपुष्प गुंफताना डॉ. उपाध्ये बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते कुलदीप धुमाळ, गतिराम भोईर, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, आपल्या संस्कृतीतील धार्मिक ग्रंथांमध्ये त्रेतायुगात मंत्रशक्ती, कृतयुगात ज्ञानशक्ती, द्वापारयुगात युद्धशक्ती आणि कलियुगात संघशक्ती अस्तित्वात राहील, असे नमूद केले आहे. त्यामुळेच ज्यांची संघशक्ती प्रबळ असेल तेच जेते ठरतात. ‘सांख्य’ शब्दाचा अर्थ ज्ञानाशी निगडित आहे. सारासारविवेक वापरून जो वागतो तो सांख्यिक होय. लोकशाहीत संख्याबळाच्या माध्यमातून सत्ता प्राप्त केली जाते. एकगठ्ठा मतांमुळे संख्या विरुद्ध सांख्य हा संघर्ष सुरू झाला आहे. खरे म्हणजे सांख्य विरुद्ध सांख्य असा हा संघर्ष आहे.
कारण ज्ञानी लोक एकत्र येत नाहीत, हीच आपल्या लोकशाहीची शोकांतिका आहे. संख्या विरुद्ध सांख्य या संघर्षात सज्जनशक्तीची नपुंसकता घातक आहे. मुळात भारतीय हे जगात सहिष्णू मानले जातात. हिंदू हा धर्म नसून ती आचरणशैली आहे.
भक्तिविषयी लोकशाही असलेली ही जीवनप्रणाली आहे. याशिवाय ती असंघटित आहे. या पार्श्वभूमीवर संख्याबळामुळे जगातील अनेक देशात जातीय हैदोस वाढला आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ , ‘हे विश्वचि माझे घर’ किंवा ‘सर्वे सुखिन: सन्तु’ हे आपले तत्त्वज्ञान कितीही मानवतावादी असले तरी तुष्टीकरणाची राजकीय भूमिका संख्याबळाला खतपाणी घालते आहे, ही गोष्ट विसरता येणार नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा एक देश, एक देव, एक भाषा हा विचार अंमलात आणावा लागेल. प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजीमहाराज जन्माला येतील ही अपेक्षा करणे उचित होणार नाही. सांख्यांची संख्या वाढविल्यानंतरच संख्याबळाचा मुकाबला करता येईल. आपण अतिरेकी व्हावे असा याचा अर्थ नाही; परंतु संख्याबळाचा प्रतिकार सज्जनांच्या समूहशक्तीने केला पाहिजे. गौतम बुद्ध, तुकोबा, चोखोबा, तुकडोजी महाराज यांची संतवचने, स्वरचित कविता आणि जागतिक संदर्भ उद्धृत करीत उपाध्ये यांनी निरूपण केले.
महेश गावडे, बंडू बारसावडे, अवधूत कुलकर्णी, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.