(चित्र – व्ही शिवनकुट्टी)
कोची (प्रतिनिधी) १३.६.२४
स्त्री पुरुष समानतेची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. आपल्या संविधानात स्त्रीपुरुष समान आहेत असे म्हटले पण प्रत्यक्षात तसे होताना कुठे दिसत नाही. आज आपल्या आजुबाजूला महिलांवरील अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. यासाठी मुलांमध्ये शाळा तसेच घरापासूनच स्त्रीपुरुष समानतेची मूल्य रुजवायला पाहिजेत.
असाच प्रयत्न केरळ राज्यामधील शाळांमध्ये सुरू आहे. कोची येथील सरकारी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका सिंधू यांनी पाठ्यपुस्तकांतील नव्या बदलांमुळे स्त्री-पुरुष समानतेसंदर्भात एक सकारात्मक चित्र उभे राहत असल्याचे म्हटले. स्वयंपाक वा इतर घरकाम करणे ही आई-वडील दोघांचीही सामूहिक जबाबदारी असल्याची शिकवण मुलांमध्ये रुजत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
त्या पुढे म्हणाल्या, हे बदल फारच सकारात्मक आहेत. स्वयंपाक अथवा घरकाम करणे ही फक्त बाईचीच जबाबदारी आहे, असा एक अलिखित नियम समाजामध्ये रूढ झाला आहे. मुलांमध्ये स्त्री-पुरुष समानता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता व वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्ये रुजावीत यासाठी त्या संदर्भातील धडेदेखील अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांना POCSO नियमांची माहिती व्हावी, यासाठीही काही बदल केले आहेत.
केरळ सरकारने केलेले बदल फक्त पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित नाहीत तर यामुळे घरातही मूलही वडिलांना प्रश्न विचारतात, तुम्ही का नाही घरातील काम करत. त्यांनी काही सरकारी शाळांच्या गणवेशातही बदल केला आहे. लिंगनिरपेक्षतेचे तत्त्व अंमलात आणून मुला-मुलींचे गणवेश एकसारखेच केले आहेत. प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या १० वर्षीय शिवानंदा महेश या मुलीने ‘द गार्डियन’शी बोलताना म्हटले, मला या गणवेशामध्ये फारच उत्साही आणि आरामदायी वाटते.
स्त्री-पुरुष समानता आणण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, केरळने स्त्री-पुरुष समानतेसाठी काही महत्त्वाचे बदल घडवून आणल्यानंतर देशातील इतरही राज्ये या निर्णयाचे अनुकरण करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.