मुंबई | ३.५ | रयत समाचार
(Rip news) ज्येष्ठ पत्रकार, मार्गदर्शक आणि शेकडो विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले अभय मोकाशी (वय ६९) यांचे २ मे रोजी रात्री कर्करोगाशी दीर्घ झुंज दिल्यानंतर निधन झाले. त्यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली असून एक प्रामाणिक, तडजोड न करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.
(Rip news) गेल्या काही महिन्यांपासून मोकाशी हे बोरीवली येथील रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृती अत्यंत खालावल्याने ते जीवनावश्यक यंत्रणांवर होते. नियमित अन्न घेणे शक्य नसतानाही अनेकदा ट्यूबद्वारे आहार दिला जात होता. मात्र या कठीण परिस्थितीतही त्यांनी आपली सकारात्मकता आणि वैशिष्ट्यपूर्ण विनोदबुद्धी कायम ठेवत मित्र व विद्यार्थ्यांशी संवाद जिवंत ठेवला. पत्रकार म्हणून त्यांनी नेहमीच ताठ कणा ठेवून काम केले. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक तडजोडीपासून दूर राहत त्यांनी पत्रकारितेची मूल्ये जपली. कोलकात्यातील ऐतिहासिक ‘अमृत बाजार पत्रिका’ हे वृत्तपत्र पुन्हा सुरू करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. तसेच पत्रकारितेचे शिक्षण देत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना घडवले.
(Rip news) शिक्षक, संपादक आणि लढवय्या पत्रकार : विले पार्ले केळवाणी मंडळाच्या पत्रकारिता संस्थेचे प्रमुख म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी नवे विचारमंथनाचे दालन उघडले. कम्युनिस्ट नेत्या कॉ. तारा रेड्डी यांची मुलाखत आणि व्याख्यान आयोजित करून त्यांनी विद्यार्थ्यांना वास्तववादी पत्रकारितेची दिशा दिली. त्या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीतही त्यांनी तयार केली होती. मोकाशे यांनी मुंबई मिड डे उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर पुणे मिड डे सुरू करण्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. आंदोलनांच्या बातम्यांद्वारे सामाजिक परिणाम घडवून आणण्याचे कौशल्य त्यांच्या लेखणीत होते. प्रतिभा इमारत प्रकरणासारख्या बातम्यांनी मुंबईत मोठी खळबळ उडवली आणि प्रशासनाला निर्णय घ्यायला भाग पाडले.
विकाऊ पत्रकारांच्या गर्दीत न झुकणारा : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, अभय मोकाशी हा तडजोड न करणारा, दबावाला न झुकणारा पत्रकार होता. कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देतानाही तो तटस्थ आणि तर्कशुद्ध राहिला. विकाऊ पत्रकारांच्या गर्दीत तो कधीच सामील झाला नाही.
ते पुढे म्हणाले, अभय हा माझा नातेवाईकही होता. माझी आई तारा रेड्डी यांच्यावर त्याचे विशेष प्रेम होते. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवण्याची ताकद त्याच्यात होती.
अभय मोकाशी यांच्या पार्थिवावर ३ मे २०२६ रोजी बोरीवली (पूर्व) येथील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अभय मोकाशी यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक ध्येयवादी, निर्भीड आणि मूल्यनिष्ठ आवाज कायमचा शांत झाला आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
