History | एनसीईआरटीच्या पुस्तकातून शिवरायांच्या मराठा साम्राज्याचा नकाशा वगळला; संभाजी छत्रपतींचा संताप

1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवी दिल्ली | १३.४ | रयत समाचार

(History) एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळण्यात आल्याने संताप व्यक्त करत युवराज संभाजी छत्रपती यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हा निर्णय मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाचा व राष्ट्ररक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

(History) युवराज संभाजी छत्रपती यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री यांना सविस्तर पत्र पाठवून हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी पत्रात नमूद केले की, मराठा साम्राज्याचे प्रभुत्व संपूर्ण भारतीय उपखंडावर होते, याबाबत अनेक समकालीन पुरावे आणि इतिहासकारांचे संशोधन उपलब्ध आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बाबींचे वगळणे योग्य नसून विद्यार्थ्यांना अपूर्ण व चुकीचा इतिहास दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

(History) ते पुढे म्हणाले, मराठा साम्राज्याने भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडणीत मोठे योगदान दिले आहे. स्वराज्य स्थापनेपासून ते उत्तर भारतापर्यंत विस्तारलेल्या मराठा शक्तीने देशाच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावली. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे.
संभाजी छत्रपती यांनी स्पष्टपणे मागणी केली की, मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा. तसेच इतिहासाचे सादरीकरण हे शास्त्रशुद्ध, संतुलित आणि वस्तुनिष्ठ असावे, यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशीही त्यांनी विनंती केली.
या घडामोडीमुळे शैक्षणिक व ऐतिहासिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले असून, अनेक इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी आणि मराठा संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.

Share This Article