Women | संघभाजपात महिलांना ‘सर्वोच्च’ नेतृत्वाची संधी का नाही- चौधरी; काँग्रेसमध्ये १९२५ पासून महिलांना नेतृत्व, पण संघ भाजपात शून्यच

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | १२.४ | रयत समाचार

(Women) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्या नेतृत्वात महिलांचे प्रतिनिधित्व अत्यल्प असल्याचा मुद्दा उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी परखड टीका केली आहे.

(Women) चौधरी यांनी ऐतिहासिक संदर्भ देत सांगितले की, ज्यावर्षी संघाची स्थापना झाली (१९२५), त्याच वर्षी सरोजिनी नायडू काँग्रेसच्या पहिल्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या होत्या. त्याकाळात अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये महिलांना नुकतेच मतदानाचे हक्क मिळत होते. अशा परिस्थितीत काँग्रेसने महिलेला ‘सर्वोच्च पद’ देणे हे प्रगत विचारांचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावरून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे खरे पुरोगामी नेते होते, असेही चौधरी यांनी म्हटले.

(Women) संघात एकही महिला सरसंघचालक नाही : चौधरी यांनी थेट सवाल उपस्थित करत विचारले, संघात आजपर्यंत किती महिला सरसंघचालक झाल्या? याचे उत्तर त्यांनी “शून्य” असल्याचे सांगितले. तसेच, भाजपामध्येही महिलांना सर्वोच्च पदावर संधी मिळालेली नाही. “भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आजपर्यंत एकही महिला निवडली गेलेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातही चित्र तेच : महाराष्ट्राच्या संदर्भात बोलताना चौधरी म्हणाले, १९८८ साली प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. पण भाजपाच्या बाबतीत परिस्थिती वेगळीच आहे. “४६ वर्षांचा इतिहास असलेल्या भाजपामध्ये महाराष्ट्रात एकही महिला प्रदेशाध्यक्ष झालेली नाही,” असे त्यांनी नमूद केले.
महिलांनी विचार करावा : शेवटी चौधरी यांनी भाजपला पाठिंबा देणाऱ्या महिलांना उद्देशून म्हटले, “शिकलेल्या सवरलेल्या महिलांनी या वास्तवाचा गांभीर्याने विचार करावा. महिलांना नेतृत्वात स्थान न देणाऱ्या व्यवस्थेचे समर्थन का करायचे, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारायला हवा.”
या विधानांमुळे महिला नेतृत्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
Share This Article