Crime | एमडी अपहार प्रकरणी पीआय कबाडींना सहआरोपी करण्याची मागणी; 15 एप्रिलपासून उपोषणाचा इशारा

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | २.४ | रयत समाचार

(Crime) अहिल्यानगर पोलीस मुख्यालयातील अंमली पदार्थ साठवणूक केंद्रातून मोठ्या प्रमाणात एमडी (मेफेड्रोन) अपहार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना निलंबित करून सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, १५ एप्रिलपर्यंत कारवाई न झाल्यास नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.

(Crime) पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने १७ जानेवारी रोजी शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शादाब शेख व शिंदे या आरोपींकडून १ किलो ५२ ग्रॅम एमडी जप्त केले होते. या तपासादरम्यान महेश गायकवाड आणि ऋषिकेश चित्तर यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ९ किलो ६५५ ग्रॅम, सुमारे २ कोटी १० लाख ४० हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. अशाप्रकारे एकूण १० किलो ९७५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला.

(Crime) तपासादरम्यान आरोपी ऋषिकेश चित्तर याने हा एमडी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याच्याकडून मिळाल्याची कबुली दिल्यानंतर, शिरूर पोलिसांनी २१ जानेवारी रोजी गुजर याला अटक केली.
या प्रकरणाचा अहवाल ४ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे सादर करण्यात आला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात धक्कादायक बाब उघड झाली—जप्त १० किलो ९७५ ग्रॅम एमडीचा अपहार करून त्याऐवजी मैद्याच्या पिठाच्या गोण्या ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी पीआय कबाडी यांच्याकडे सोपवली. त्यानुसार, ७ फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात श्यामसुंदर गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र, शाकिर शेख यांनी आरोप केला आहे की, कबाडी यांना वाचवण्यासाठीच त्यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी देण्यात आली. अंमली पदार्थ साठवणूक केंद्राचे प्रभारी म्हणून त्या मालाच्या सुरक्षिततेची जबाबदारी कबाडी यांच्यावर असताना त्यांच्या कार्यकाळात एवढ्या मोठ्या प्रमाणात अपहार होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सीसीटीव्ही व्यवस्था, दुहेरी कुलूप प्रणाली आणि नियमित तपासणी यांचा अभाव असल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय, वरिष्ठ स्तरावरील देखरेखीतही त्रुटी राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नियमांनुसार दर तीन महिन्यांनी अंमली पदार्थ साठवणूक केंद्राची तपासणी करणे आवश्यक असताना, ती करण्यात आली नसल्याचेही नमूद करण्यात आले.
शेख यांनी पुढे असा दावा केला की, कबाडी यांच्या पूर्वीच्या सेवाकाळातही त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांवर खंडणी प्रकरणात कारवाई झाली होती. तरीही त्यांच्यावर ठोस कारवाई न करता त्यांची महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, आमदार हेमंत ओगले यांनीही या प्रकरणावर विधानसभेत प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
शाकिर शेख यांनी मुख्यमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडे निवेदन देऊन या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. १५ एप्रिलपूर्वी कारवाई न झाल्यास नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.

हे हि वाचा : History | द इंडियन्स : दक्षिण आशियाच्या इतिहास अभ्यासकांसाठी उपयोगी संदर्भग्रंथ – प्रा.डॉ.श्रध्दा कुंभोजकर


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading