अहमदनगर | २८.१० | रयत समाचार
(Cultural Politics) सदगुरु माता सुदिक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन छत्रछायेखाली निरंकारी मिशनचा ७८ वा वार्षिक निरंकारी संत समागम यावर्षी ता. ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान हरियाणातील समालखा येथे भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला. या चार दिवसीय आत्मिक सोहळ्यात नगर शहरासह जिल्ह्यातील तसेच अहिल्यानगर विभागातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आदी शाखांमधून हजारो निरंकारी भक्त सहभागी होणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख हरीश खुबचंदानी यांनी दिली.
(Cultural Politics) यंदाच्या समागमाचा विषय ‘आत्ममंथन’ असून, या माध्यमातून भक्तांना गीत, भजन, कविता आणि प्रवचनांद्वारे आत्मिक चिंतन, भक्तिभाव आणि मानवतेचा संदेश दिला जाणार आहे. सदगुरु माताजी आणि निरंकारी राजपिताजींच्या प्रवचनरूपी अमृतवाणीचा लाभ मिळवण्यासाठी देश-विदेशातून श्रद्धाळू भाविक या समागमस्थळी पोहोचत आहेत.
(Cultural Politics) हा संत समागम केवळ एक धार्मिक उत्सव नसून ज्ञान, प्रेम आणि भक्तीचा संगम आहे, जो ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा सेतू ठरतो. येथे सहभागी होणारे भाविक मानवता, विश्वबंधुत्व आणि परस्पर प्रेमाचे मूल्य आत्मसात करतात.
समालखा येथील शेकडो एकर क्षेत्रावर उभारलेल्या या ‘दिव्य नगरी’त विशाल मांडव, एलईडी स्क्रीन, वाहतूक व निवासव्यवस्थेचे सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. दूरवर बसलेल्या श्रद्धाळूंनाही मंचावरील प्रवचन आणि भजनांचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली.
गतवर्षीप्रमाणेच यंदाही मुंबईच्या श्रद्धाळूंच्या वतीने तयार केलेले मुख्य स्वागतद्वार लक्षवेधी ठरत असून, ते कलात्मकता, समर्पण आणि सेवाभावाचे प्रतीक ठरत आहे. सदगुरु माताजींच्या दिव्य प्रेरणेने आणि आशीर्वादाने होणारा हा समागम प्रत्येक भक्तासाठी आत्मबोध, आत्मशुद्धी आणि अध्यात्मिक उन्नतीचा प्रवास ठरणार आहे.
