Women | विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ– प्राचार्य अर्चना पत्की; नवदुर्गा व्याख्यानमाला : स्त्रीशक्तीच्या नऊ रूपांचा प्रवास

मुंबई | ०२.९ | गुरुदत्त वाकदेकर

(Women) सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथे आयोजित ‘शारदोत्सव व्याख्यानमाला २०२५’ स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना उजाळा देणारी आणि विद्यार्थिनींना आत्मप्रेरणा देणारी ठरली. यावर्षीची संकल्पना “नवदुर्गा : नवविचार – बहुआयामी स्त्री” अशी होती.

(Women) प्राचार्य अर्चना पत्की यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले, नवदुर्गेचा स्वयंपूर्णतेकडे जाणारा प्रवास विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आहे. या व्याख्यानमालेतून स्त्रीच्या नेतृत्वापासून सुरक्षेपर्यंतचे सर्व आयाम उलगडले जातात.

(Women) नऊ माळांतून स्त्रीशक्तीचा आविष्कार : पहिली माळ : व्हॉईस कोच व इतिहासकथनकार पद्मश्री राव यांनी “जिजाबाई : स्वराज्य जननी राष्ट्रमाता” या विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले, “आज प्रत्येक स्त्रीने स्वतःमधील जिजाऊ शोधली पाहिजे.”
दुसरी माळ : संगीत विशारद अॅड. सुरेखा भुजबळ यांनी “गंध सुरांचा ठाव – स्त्रीमनाचा” या विषयावर संगीत व स्त्रीमनाचा गाढ संबंध स्पष्ट केला.
तिसरी माळ : कथाकथनकार मंजिरी देवरस यांनी “पुल – सुनीताबाई सहजीवन” या कथेद्वारे स्त्रीच्या सहजीवनातील महत्त्व अधोरेखित केले.
चौथी माळ : समाजसेविका जयश्री चौधरी यांनी “स्त्रीचे समाजभान” मांडताना सांगितले, “स्त्री सजग झाली की संपूर्ण समाज सुजाण व प्रगतिशील होतो.”
पाचवी माळ : लेखिका डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी ‘स्व-कथाकथन’ सादर करत आत्मशोध आणि स्त्रीअनुभव विद्यार्थिनींसमोर मांडले.
सहावी माळ : निवेदिका वैशाली जाधव यांनी कोसबाडच्या टेकडीवरून स्त्रीशक्ती व सुरक्षेचा प्रवास सांगितला.
सातवी माळ : कवयित्री व दंतचिकित्सक डॉ. रिबेका दोडती यांनी “दातापासून दातांकडे” या कवितेद्वारे सौंदर्य व आरोग्यातील स्त्रीची जागरूकता अधोरेखित केली.
आठवी माळ : अश्विनी गाडगीळ (अहिल्या महिला मंडळ अध्यक्षा) यांनी महिलांच्या आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठीचे उपक्रम विद्यार्थिनींना समजावले.
नववी माळ : एपीआय गौरी जगताप-पाटील यांनी स्त्री सुरक्षा व सायबर क्राईम विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल युगात महिलांनी आत्मविश्वासाने आणि जागरूकतेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.
व्याख्यानमालेदरम्यान नेतृत्व, समाजभान, सहजीवन, आत्मशोध, कलात्मकता आणि सुरक्षा या आयामांतून स्त्रीशक्तीचा बहुआयामी प्रवास समोर आला. या सर्व सत्रांमधून विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाली, स्त्रीच्या कार्याचा नवा आलेख अनुभवता आला आणि स्त्रीसक्षमीकरणाची नवी दृष्टी रुजली.
नवदुर्गेच्या नऊ रूपांतून उलगडलेले विचार हेच आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक दीप आहेत. स्त्री ही करुणा, पराक्रम आणि परिवर्तनाची अखंड ऊर्जा आहे, असा ठाम संदेश या व्याख्यानमालेतून देण्यात आला.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी

Share This Article