Politics | भाकप महाअधिवेशनात महाराष्ट्राची ठसा उमटवणारी कामगिरी; राष्ट्रीय कौन्सिलवर महाराष्ट्र कॉम्रेड्स; विविध आघाड्यांमधूनही प्रतिनिधित्व

चंदीगड | २५.९ | रयत समाचार

(Politics) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) २५व्या त्रैवार्षिक राष्ट्रीय महाअधिवेशनाचा आज ता.२५ रोजी समारोप झाला. शेवटच्या दिवशी राष्ट्रीय कौन्सिलच्या १२५ सदस्यांच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून चार कॉम्रेड्स निवडले गेले. राज्याला चार जागांचा कोटा मिळाल्यानंतर झालेल्या चर्चेनंतर एकमताने या निवडी पार पडल्या.

 

(Politics) महाराष्ट्राच्या २४ प्रतिनिधींच्या बैठकीनंतर राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे (पश्चिम महाराष्ट्र), राज्य सहसचिव कॉ. राजू देसले (उत्तर महाराष्ट्र), राज्य सहसचिव कॉ. शाम काळे (विदर्भ) आणि मुंबई जिल्हा सचिव कॉ. मिलिंद रानडे (मुंबई) यांची राष्ट्रीय कौन्सिलवर निवड करण्यात आली. यापैकी तिघे जण प्रथमच या कौन्सिलवर पोहोचले आहेत.

 

(Politics) दरम्यान, ११ सदस्यांच्या सेंट्रल कंट्रोल कमिशन (CCC)मध्ये औरंगाबादचे कॉ. राम बाहेती पुन्हा निवडून आले आहेत. या कमिशनच्या स्वतंत्र बैठकीत डॉ.के. नारायण (तेलंगणा) यांची अध्यक्ष म्हणून, तर कॉ. राम बाहेती यांची सचिव म्हणून बिनविरोध निवड झाली.

 

विविध आघाड्यांतून महाराष्ट्राला मिळालेले प्रतिनिधित्वही लक्षणीय ठरले. किसान आघाडीतून किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. राजन क्षीरसागर (परभणी), विद्यार्थी आघाडीतून AISF चे राष्ट्रीय अध्यक्ष विराज देवांग (नाशिक), तसेच ट्रेड युनियन आघाडीतून आयटकच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य कॉ. बबली रावत (मुंबई) यांची राष्ट्रीय कौन्सिलवर निवड झाली आहे.

 

१२५ सदस्यीय राष्ट्रीय कौन्सिलमधून ३१ जणांची कार्यकारिणी व त्यामधून ११ जणांचे राष्ट्रीय सचिव मंडळ निवडण्यात आले. महाअधिवेशनाचा समारोप “CPI जिंदाबाद” या घोषणांनी झाला.

 

Share This Article