Politics | सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा- राज ठाकरे; किमान ₹30 ते 40 हजार नुकसान भरपाई द्या

54 / 100 SEO Score

मुंबई | २५.९ | रयत समाचार 

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या पावसाने उघडीप घेतली नसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून कित्येक ठिकाणी जमीन खरवडून वाहून गेली आहे. त्यामुळे केवळ तुटपुंज्या नुकसानभरपाईने शेतकऱ्यांचे सांत्वन होणार नाही, असे स्पष्ट करत ठाकरे यांनी सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून एकरी किमान ३० ते ४० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे.

 

गेल्या काही वर्षांतल्या बेफाम खर्चामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी सरकारने हात आखडता न घेता केंद्राकडे पॅकेजसाठी पाठपुरावा करावा, असे त्यांनी पत्रात सुचविले आहे. बिहारला केंद्राकडून अशाप्रकारे मदत मिळाल्याचे उदाहरण देत महाराष्ट्रालाही तातडीची मदत मिळायला हवी, असे ठाकरेंनी नमूद केले. शिक्षण, आरोग्य आणि बँकांच्या वसुली या मुद्द्यांवरदेखील त्यांनी सरकारचे लक्ष वेधले असून, आपत्तीनंतर मुला-मुलींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, आवश्यक वह्या-पुस्तकांची सोय व्हावी, जिल्हा रुग्णालयांपासून आरोग्य केंद्रांपर्यंत औषधांचा तुटवडा भासू नये याची दक्षता सरकारने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

तसेच या काळात बँकांचा तगादा शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक तापदायक ठरतो, त्यामुळे सरकारने बँकांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अन्यथा “आमचे महाराष्ट्र सैनिक ती समज देतीलच,” असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कर्तव्य आहे, मात्र त्याची जाहिरातबाजी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे सरकारने मोहापासून दूर राहून प्रत्यक्ष मदत जाहीर करावी आणि शेतकरी कुटुंब पुन्हा उभे राहील याची हमी घ्यावी, असे राज ठाकरे यांनी पत्रात ठणकावले आहे.
Share This Article