स्वातंत्र्यदिन विशेष | राघव शिवणीकर
(World news) सन १८८५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रसभेची (राष्ट्रीय काँग्रेसची) ध्येयपूर्ती साकार होण्याचा क्षण जवळ आला होता. ता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा होणार होता. त्यामुळे ता. १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्री बरोबर बारा वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सुमारे दीडशे वर्षे फडकत असलेले इंग्रजांचे ‘युनिअन जॅक’ हे निशाण, त्या वेळचे भारताचे शेवटचे व्हॉइसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या हस्ते खाली उतरविले गेले आणि बरोबर बारा वाजून एक मिनिटाने भारताचे लाडके नेते व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचे शुभहस्ते आपल्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर काँग्रेसचे तिरंगी निशाण डौलाने फडकले. पं. जवाहरलालजींनी व किल्ल्यासमोर जमलेल्या लक्षावधी जनतेने झेंड्यास राष्ट्रीय सलामी दिली. सर्वांच्या नेत्रातून आनंदाश्रू ओघळले. मने भारावली आणि स्वातंत्र्यप्राप्तीने छाती फुगून गेली. त्याच आपल्या तिरंगी राष्ट्रध्वजास लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही सर्वांच्याबरोबर राष्ट्रीय सलामी दिली !
(World news) स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मातृभूमीच्या चरणावर आपली शिरकमले वाहिलेल्या अकरा हजार हुतात्म्यांनी स्वर्गातून जणू फुले उधळली ! भारतीय स्वातंत्र्यवीरांनी सांडलेल्या रक्ताचे, कष्टाचे व त्यागाचे चीज झाले !
(World news) ता. १५ ऑगस्टची सकाळ स्वातंत्र्यरविच्या नवकिरणांनी तेजःपुंज दिसू लागली. भारताच्या काना-कोपऱ्यात खेड्यापाड्यात राष्ट्रीय काँग्रेसचा तिरंगी ध्वज डौलाने फडकला. त्या वेळच्या सुमारे तीस कोटी भारतीय जनतेने ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत गाऊन नंतर
“विजयी विश्व तिरंगी प्यारा। झेंडा उँचा रहे हमारा, शान न इसकी जाने पाये। चाहे जान भली ही जाये, विश्व विजय कर के दिखलाये। तब होवे प्रण पूर्ण हमारा।”
हे ध्वजगीत गाऊन त्याच्या रक्षणासाठी सर्वांनी प्राणाची कुरवंडी करण्याची शपथ घेतली. सरकारी कचेऱ्या तसेच सार्वजनिक संस्थांच्या इमारतीवर तिरंगी ध्वज फडकले. इतकेच काय पण प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घरापुढे ध्वज उभारुन सडे, रांगोळ्या व पुष्पांनी आपल्या घराघरांचे प्रांगण सुगंधित केले. आम्हा स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांना तर अस्मान ठेंगणे वाटू लागले !
बॅ. महंमदअली जीनांच्या स्वप्नाप्रमाणे पाकिस्तानची मागणी पूर्ण झाली. परंतु त्याच वेळी हिंदू-मुसलमानांचे दंगे होऊन पाकिस्तानमधून लक्षावधी निर्वासितांचा लोंढा भारताकडे येऊ लागला. नौखालीमध्ये हिंदूंच्या लहान मुलांना दारावर खिळे ठोकून मारल्याच्या बातम्या जाहीर होत होत्या. कित्येक मातांनी आपली मुले विमान-उड्डाणाच्या वेळी त्यामध्ये फेकून देऊन, ‘जा पाखरा जा, वणव्यातुनी या । पृथ्वीच आई पुढती तुझी रे !’ असे म्हटल्याचे काव्य त्याकाळी हृदयाचा ठाव घेत होते ! त्यामुळे हिंदू-मुस्लिमांचा पेटलेला वणवा, शांत करण्यासाठी राष्ट्रपिता म. गांधीजींनी त्यावेळी पदयात्रा काढून दोन्ही जमातीमध्ये शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यावेळी मात्र मुस्लिम बांधवांनी म. गांधीजींच्या सुरक्षिततेची जीवापाड काळजी घेतली होती. बापूजी आणि त्यांचे सहकारीही एका गावाहून दुसऱ्या गावाला जाताना आपल्या बरोबर त्या गावच्या कोणत्याही ग्रामस्थांना घेत नव्हते ! भीती ही महात्माजींच्या पुढे कधीच थाऱ्याला उभी राहिलेली नव्हती !
बापूजींच्या पदयात्रेने हिंदू-मुस्लिमांचा दंगा शांत होण्यास फार मोठी मदत झाली. म. गांधीजींचे नौखालीत शांतता प्रस्थापित करण्याचे चाललेले कार्य म्हणजे खऱ्या मानवतेचा साक्षात्कार होता ! त्यासाठी ते वणवण फिरत होते. गरिबांच्या झोपडीत ईश्वर जाऊन, त्यांचे अश्रू पुशीत होता. त्याच वेळी भारतात स्वातंत्र्यदिनाचा पहिला सोहळा साजरा होत होता.
मात्र हा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा दिल्लीमध्ये साजरा होत असताना देशासाठी फकिरी पत्करलेला तो नंगा फकीर, महामानव, थोर महात्मा, सत्य आणि अहिंसेचा पुजारी, गरिबांची दुःखे निवारणारा देवदूत दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी नौखालीत वणवण फिरत होता. ज्याने स्वराज्य मिळावे म्हणून जीवाचे रान केले, त्या महात्म्याचा महान आत्मा पोळलेल्यांना चंदन लावण्यासाठी रानभरारी झाला होता. समारंभाचे वेळी त्यांना अगत्याने स्वातंत्रदिन सोहळ्यास उपस्थित ठेवून त्यांचा आशीर्वाद सर्वांनी घ्यायला हवा होता !
कदाचित् स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा आनंद लुटण्यापेक्षा हिंदू-मुस्लिमांचे जातीय दंगे मिटवून त्यांच्यामध्ये शांतता निर्माण करण्याचे कामच जास्त महत्त्वाचे आहे असे त्यांना वाटल्यामुळे ते नौखालीतच दुःखितांना दिलासा देत फिरत राहिले असावेत. या स्वातंत्र्यदिन समारंभाचे वेळी त्यांना उपस्थित ठेवण्यासंबंधी पंडित जवाहरलाल नेहरु विसरले होते असे नव्हे; परंतु महात्माजींनाच शांतता प्रस्थापित करण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे असे वाटल्यामुळे ते भारताच्या त्या पहिल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित नव्हते. मला मात्र त्या सोहळ्यास बापूजी नव्हते या गोष्टीचा सतत खेद होतो.
स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या समारंभात क्रां. नाना पाटील तासगाव व खानापूर तालुक्यातील आठ-दहा ठिकाणी भाषणे करुन, संध्याकाळी ५ वा. हणमंतवडिये येथील सभेसाठी आले होते. ग्रामस्थ व परिसरातील बहुसंख्य जनता आज त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आतूर झाली होती. पाटील दिवसभर सतत बोलतच राहिले होते. जणू त्यांच्या घशाला आणि आवाजाला आज वेगळीच धार आलेली होती. सातारचा सिंह आज गगनभेदी गर्जनेने, आनंदातिरेकामुळे डरकाळ्या फोडू लागला होता. पाटील सभेत म्हणाले होते, “बांधवांनो ! आजचा सुदिन तमाम भारतीयांच्या त्यागाने व कष्टाने उगवलेला आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला प्यारा तिरंगा, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु यांचे शुभहस्ते फडकलेला आहे. त्या आपल्या झेंड्याला इंग्रजांचे शेवटचे व्हॉइसराय लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही अगदी वाकून सलामी केलेली आहे. त्या झेंड्याच्या वरचा ‘केशरी रंग’ हुतात्म्यांनी सांडलेल्या लाल रक्ताचे प्रतिक असून तो त्यांच्या त्यागाचा संदेश तुम्हा-आम्हाला देत आहे. तसेच झेंड्याचा मधला ‘पांढरा रंग’ मांगल्याचे व शांततेचे प्रतिक असून, तो भारतीयांना येथून पुढे सुखसमृध्दीच्या पावित्र्याचा संदेश देत आहे. आणि झेंड्याचा ‘हिरवा रंग’ शेतकऱ्यांच्या हरित क्रांतीचा असून तो त्यांची भरभराट होण्याचा आपणास मंत्र देत आहे, या झेंड्याची प्रतिष्ठा व शान आपण प्राणपणाने वाढविली पाहिजे. ‘जगायचे तर या तिरंगी झेंड्यासाठी आणि मरायचे तर या झेंड्यासाठीच’ हा मंत्र आपण जपायचा आहे. असे पाटील म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला होता.
क्रांतिसिंह नाना पाटील सभेत पुढे म्हणाले की, “बांधवांनो ! आजचे आपले हे स्वातंत्र्याचे बाळ रात्री बारा वाजून एक मिनिटाने आणि अगदी श्रावण महिन्यातच जन्माला आलेले आहे. आपणास आठवत असेल की, कंसाच्या बंदीशाळेत वसूदेव व देवकीचे बाळ रात्रीच जन्माला आले होते. त्या बाळाला घेऊन वसुदेव यमुना नदी पार करुन गोकुळात नंदाघरी गेले होते; आणि नंद-यशोदेच्या ताब्यात देऊन, निश्चिंत मनाने परत आले. आपल्या स्वातंत्र्याच्या बाळाचे जन्मास म्हणूनच मी श्रीकृष्ण जन्माची उपमा देत आहे.
श्रीकृष्णास गोकुळवासीयांनी ज्याप्रमाणे अत्यंत प्रेमाने वाढविले त्याप्रमाणे आपल्या स्वातंत्र्य बाळाला जपून, त्याचे प्राणपणाने रक्षण करुन त्याला आपण समर्थ बनविले पाहिजे आणि तोच आजच्या स्वातंत्र्यदिनाचा अर्थ होय !” असे म्हणताच सभेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता.
मी त्यावेळी हणमंतवडिये या गावी नुकताच प्राथमिक शिक्षक म्हणून काम करीत होतो. त्यामुळे मला ते पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे क्रांतिसिंह नाना पाटलांचे भाषण अत्यंत चिरस्मरणीय असेच वाटले ! (मला इ.७ वी चे व्ह.फा. परिक्षेत शे. ६५ % मार्क्स मिळालेले असल्यामुळे सन १९४७ साली प्राथमिक शिक्षकाची नोकरी ताबडतोब मिळाली होती.)
क्रां. नाना पाटील चव्वेचाळीस महिन्याच्या अज्ञातवासातून नुकतेच प्रगट झालेले असल्यामुळे त्यांचेकडे दररोज अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, सत्कार-समारंभ व दौरे यांची सारखी रीघ सुरु झाली होती. तसेच त्यांचेकडे शेकडो पत्रे सतत येत असल्यामुळे दौऱ्याच्या धावपळीत त्या पत्रांना उत्तर पाठविण्याचे काम रेंगाळू लागले होते. तसेच त्यांना आता सतत त्यांचेबरोबर राहून पत्रव्यवहार पहाणारा खाजगी चिटणीस (पी.ए.) हवा होता. त्यामुळे क्रां. नाना पाटील, सर्वश्री नाथाजी लाड, अप्पासाहेब लाड, व भगवानराव पाटील (बप्पा) यांनी एकत्र बसून या प्रश्नावर विचारविनिमय केला आणि त्यांचे नजरेसमोर (मी स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतलेला असल्यामुळे) चटकन माझे नाव आले. त्याच दिवशी ते चौघेजण रात्री १० वा. आपली मोटार घेऊन आमच्या घरी आलेले पाहून माझ्या आईवडिलांना व मला अत्यंत आनंद झाला.
(लेखक हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे खाजगी चिटणीस होते)
