पुणे | २६ जून | प्रतिनिधी
(India news) “भारतीय राजचिन्हाऐवजी ‘सेंगोर’ वापरणं म्हणजे थेट घटनाद्रोह आहे. यामागील सूत्रधार कोण आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केली आहे.
(India news) देशात आणीबाणी लागू करून संविधानाची हत्या झाल्याच्या दिवशी केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण खात्याच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत राजचिन्हाऐवजी सेंगोरचा वापर करण्यात आला. यावर चौधरी यांनी गंभीर आक्षेप नोंदवला आहे. “या जाहिरातींमागे भाजपचा प्रचार हेतू असून, जनतेच्या पैशाचा वापर पक्षीय फायद्यासाठी केला जातो आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
राजचिन्हाऐवजी सेंगोर; आदेश कुणाकडून?
(India news) “राजचिन्ह हे भारतीय सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. त्याऐवजी कोणत्याही अनधिकृत प्रतीकाचा वापर म्हणजे घटनात्मक अपमानच. हा निर्णय फडणवीस किंवा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या लेखी आदेशाने झाला का? की अधिकाऱ्यांनी स्वतःहून कुणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चौधरी म्हणाले की, या संदर्भात माहिती अधिकारात विचारणा करण्यात आली आहे. त्यात पुढील मुद्द्यांची माहिती मागवण्यात आली आहे: सेंगोर वापरण्याचे आदेश कोठून व कधी आले? यासंदर्भात किती निधी खर्च झाला? मंजुरीची प्रक्रिया व फायलींचा प्रवास कसा होता?
सांस्कृतिक संचालनालयाचा काय संबंध?
“आणीबाणी ही सांस्कृतिक घटना नव्हती. मग सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे यामध्ये नेमके काय योगदान आहे? महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश गेले, हेही समजते. त्यामुळे आता केवळ केंद्र नव्हे, तर राज्य सरकारचाही सहभाग स्पष्ट होत आहे,” असे चौधरी यांनी नमूद केले.
विरोधकांनी पुढे यावे – मागणी
“हा प्रकार केवळ एका अधिकाऱ्याची चूक नाही, तर संविधान व जनतेचा विश्वास डावलणारा कृत्य आहे. विरोधी पक्षांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर व जबाबदार राजकीय नेत्यांवर कारवाईची मागणी केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
“या प्रकरणाचा मी वैयक्तिकरित्या पाठपुरावा करणार आहे. ही बाब गप्प बसण्यासारखी नाही,” असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
