खोपोली | २० जून | प्रतिनिधी
आज सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ एक भीषण अपघात घडला. खासगी प्रवासी बस आणि एक चारचाकी वाहन यांच्यात जोरदार धडक होऊन त्यानंतर दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
अपघातातील कार पूर्णतः जळून खाक झाली असून, ती प्रथम लेनमध्ये होती. ही लेन जरी कारसाठी असली तरी अनेकदा मोठ्या बसेस या लेनमध्ये चुकीच्या पद्धतीने प्रवेश करतात, यामुळेच हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीप्रमाणे, एक्सप्रेसवेवर नेहमीच वाहतूक पोलीस आणि RTO अधिकाऱ्यांची गस्त असते. काही वेळा ते स्पीडगन वाहनासह थांबून दंड आकारत असतात. पण इतक्या संवेदनशील मार्गावरही त्यांच्या वाहनात अग्निशमन यंत्र (फायर एक्स्टिंगविशर) उपलब्ध नसणे, ही गंभीर बाब आहे.
अपघातात आगीमुळे वाहनांचे दरवाजे अडकतात, वायरिंग जळून बंद होऊ शकते, अशा वेळी बाहेर पडण्यासाठी वेळ अत्यंत मर्यादित असतो. त्यामुळे अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य आहे, हे यंत्रणा कधी समजून घेणार, असा सवाल स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अभिजित डब्ल्यू यांनी उपस्थित केला आहे.
त्यांच्या मते, महाराष्ट्रातील कोणत्याही RTO किंवा हायवे पोलिसांच्या वाहनात आजही फायर एक्स्टिंगविशर नाही. ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही, तर अनेकांचे प्राण धोक्यात घालणारी गंभीर चूक आहे. राज्य शासनाने आणि महामार्ग यंत्रणांनी या अपघातातून धडा घेत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
