अहमदनगर | १७ जून | प्रतिनिधी
(cultural politics) जिजाऊ ब्रिगेडच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र बैठक व गौरव समारंभाचा भव्य कार्यक्रम १५ जून रोजी नगर शहरातील ‘हॉटेल रोज गोल्ड’ मध्ये उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने महिला सबलीकरण, वैचारिक जागृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके यांनी महिलांनी वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्याची गरज अधोरेखित केली. “महिलांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करावेत, देववादी न राहता विज्ञानवादी दृष्टिकोन अंगीकारावा आणि अंधश्रद्धा, कर्मकांडांपासून दूर रहावे,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच जिजाऊ ब्रिगेडचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचले असल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले.
२५ वर्षांची संघर्षमय वाटचाल — आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश
(cultural politics) जिजाऊ ब्रिगेडची स्थापना संस्थापक जिल्हाध्यक्ष शोभाताई जाधव व शहराध्यक्षा अलकाताई शितोळे यांनी केली होती. या २५ वर्षांच्या काळात ही संस्था एका विचारशील चळवळीत रूपांतरित झाली असून, सुजाताताई ठुबे या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राजश्रीताई शितोळे या प्रदेश कार्याध्यक्ष होणे ही अहमदनगरीसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.

“रडणाऱ्या नव्हे, लढणाऱ्या महिला घडवा!” — प्रेरणादायी विचारांची उधळण
(cultural politics) कार्यक्रमात समाजसेविका संध्या मेढे, पत्रकार मीराताई शिंदे, व शहर सहकारी बँकेच्या संचालिका रेश्माताई आठरे यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, निर्भयपणे लढावे आणि जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे प्रभावी मार्गदर्शन केले.
सन्मानाची सुसंस्कृतता: ठुबे दाम्पत्याचा विशेष गौरव
जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष सुजाताताई ठुबे व मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. “हा सन्मान माझ्या कुटुंबाचा आहे. माझ्या पत्नीने स्वतःच्या करिअरचा त्याग करून कुटुंब व मुलांचे भविष्य घडवले. तिच्या समर्पणामुळेच मी समाजकार्यात झोकून देऊ शकलो,” असे भावूक उद्गार ठुबे साहेबांनी काढले.

महत्वपूर्ण निर्णय व शपथविधी
बैठकीत ‘हुंडा न देणे आणि न घेणे’ या सामाजिक प्रतिज्ञेची शपथ सर्वांनी घेतली. जिल्हावार आढावा बैठकही यावेळी पार पडली. ॲड. रवींद्र शितोळे व जय जाधव यांच्या विशेष सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. सूत्रसंचालन सोनाली वाघमारे यांनी केले, तर शहराध्यक्ष सुरेखाताई कडूस यांनी उपस्थितांचे आभार मानले.
रौप्यमहोत्सवी वर्षात नवे संकल्प, नव्या दिशा!
जिजाऊ ब्रिगेडने महिला सबलीकरणाच्या संघर्षात यशाचा टप्पा गाठून सामाजिक बदलासाठी नवा पायंडा पाडला आहे. आगामी काळातही ही चळवळ अधिक व्यापक व सशक्त होईल, याची आशा आहे.
हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
