(Education) भास्कर पांडुरंग हिवाळे शिक्षण संस्थेच्या आयएमएस (IMS) विभागाने आयोजित केलेल्या विशेष समारंभात, मानव संसाधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. बसवराज बकाली यांचा सत्कार करण्यात आला. त्यांची नुकतीच एक्साइड बॅटरी कंपनीच्या क्लस्टर हेड पदावर निवड झाल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.
(Education) समारंभात बोलताना IMS चे संचालक डॉ. एम.बी. मेहता यांनी डॉ. बकाली यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “डॉ. बकाली यांनी मानव संसाधन विभागाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थी आणि विभाग दोघांनाही नवे मार्ग मिळाले आहेत.” संस्थेचे उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. प्रनोती तेलोरे, ग्रंथालय प्रमुख डॉ. स्वाती बार्नबस यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Education) डॉ. बकाली यांनी आपल्या भाषणात IMS संस्थेच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “या संस्थेने मला दिशा दिली. येथे शिकलेले मूल्यच मी उद्योग क्षेत्रात उतरवले आणि आज त्याचाच परिणाम आहे की मी एका राष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी मानव संसाधन क्षेत्र लोकांच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडवते, यावरही विचार मांडले. “कोणतेही कार्य माणुसकीच्या दृष्टिकोनातून केल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि सकारात्मक असतात,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सय्यद मुदस्सर आणि प्रा. विजय शिंदे यांनी केले. समारंभात उपस्थित शिक्षकांनी देखील आपली मते मांडत डॉ. बकाली यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी असल्याचे सांगितले.