(Literature) इथे प्रत्येकाचे धार्मिक अस्तित्व किंवा धार्मिक ओळख सकारात्मक अथवा नकारात्मक बाजूने पणाला लागली आहे. तुम्ही हिंदू समाजातील कोणत्याही जातीत जन्मले असल्यास तुमची धार्मिक ओळख तुम्हाला सतत जाणवत राहील याची पूर्ण तजवीज या कालखंडाने केली आहे. तुम्ही हिंदू धर्माशिवाय अन्य कोणत्याही धर्मात जन्माला आलेले असाल तर मात्र तुमची धार्मिक ओळख सतत ओझे म्हणून वागवावी लागते.
(Literature) तुमच्या धार्मिक ओळखीसह तुमचे आजचे अस्तित्व कौटुंबिक स्थान व्यक्तिगत आणि शेकडो पिढ्यांचा इतिहास संस्कृती असे सारे पणाला लागते. तुमचे अस्तित्व, इमान, निष्ठा, जाणिवा सतत सिद्ध कराव्या लागतात, तपासाव्या लागतात आणि बहुसंख्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुण, निराकार जनसमूहासमोर आणि स्वतः समोर सुद्धा प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सिद्ध कराव्या लागतात.
(Literature) गुड्डा उर्फ आनंदीता चंद्रमुखी इझाबेला लॉरेन्स नावाची एक इव्हांन्जेलिकल ख्रिश्चन स्त्री या अस्वस्थ कालखंडाचे पोस्टमार्टम करत स्वतःच्याच अस्तित्वाच्या मुळांचा शोध घेते; तेव्हा ती संपूर्ण ख्रिस्ती समुदायाच्या अस्तित्वाला वेढवून टाकणारे मूलभूत प्रश्न समोर मांडते. निर्विकार, थंड, तटस्थ कोशात जगणाऱ्या प्रत्येकाला कायमचे अस्वस्थ करते. आपल्या दुभंगलेल्या समाजाचे अस्तर उसवत अमृता कुमार भारतीय समाजाची दांभिक सहिष्णुता आणि बेगडी सेक्युलर भूमिका सूक्ष्मदर्शक भिंगाखाली धरते!