अहमदनगर | ३ मे | प्रतिनिधी
(Cultural Politics) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोमवारी ता.५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास समितीचे सदस्य विनायक देशमुख यांनी दिली.
(Cultural Politics) विधानपरिषदेचे सभापती ना.प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर उपस्थित राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
(Cultural Politics) याबाबत अधिक माहिती देताना पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव समितीचे सदस्य व ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद्र मुळे यांनी सांगितले, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित “एकात्म मानव दर्शन” हा लोक कल्याणकारी विचार राष्ट्राला दिला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबई येथील रुईया कॉलेजमध्ये “एकात्म मानव दर्शन” हा विचार विशद करणारी व्याख्याने दिली होती. या व्याख्यानांना नुकतीच साठ वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने हा विचार सर्वसामान्यांपर्यंत, प्रामुख्याने युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला. राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साजरा होत असलेल्या या हीरक महोत्सवी वर्षाचा राज्यस्तरीय शुभारंभ नुकताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या विशेष पुढाकारामुळे अहिल्यानगर येथे हीरक महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोमवारी ता.५ मे रोजी होत असून अशा प्रकारे जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम करणारा अहिल्यानगर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे, अशी माहिती समितीचे सदस्य रविंद्र मुळे यांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाने समितीचे सदस्य सचिव व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे , कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी आणि समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पंडित दीनदयाल उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवी वर्ष समितीच्या वतीने करण्यात आले.
हे ही पहा : History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
