History | आचार्य अत्रेंनी बाबुराव तनपुरेंची मागितली माफी; कोर्टात मिठी मारून प्रकरण टाकले मिटवून

टी.एन.परदेशी सरांनी सांगितली मोठ्या मनाच्या माणसांची आठवण

रयत समाचार वृत्तसेवा
12 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

समाजसंवाद | ३० मार्च | भैरवनाथ वाकळे

(History) अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील राहुरी येथील तत्कालीन मोठे नेते बाबुराव तनपुरे यांच्यासंबंधी ही घटना साठच्या दशकातील, सन १९६५ च्या आसपासची. तनपुरे या आडनावावर काही श्लेष साधत आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘मराठा’तून काही लिहिले होते. म्हणून तनपुरे यांनी राहुरी कोर्टात संपादक अत्रेंविरोधात अवमानाची केस टाकली. पहिल्याच तारखेस अत्रे तेथील न्यायालयात समक्ष उपस्थित राहिले व नम्रपणे चूक कबूल करून तनपुरे यांची त्यांनी माफी मागितली. बाबुराव तनपुरे यांना मिठी मारून प्रकरण मिटवून टाकले. हि माहिती नाथधर्माचे अभ्यासक, लेखक टी.एन. परदेशी यांनी दिली.

माफी मागण्यात मनाचा मोठेपणा दिसून येतो तसेच निर्माण झालेली कटुता संपून जाते. कुछ समझमे आया ? अशी मिश्किल टीप्पणीही टी.एन.परदेशी यांनी केली.

(History) परदेशी यांनी अत्रे यांची टिका आणि क्षमायाचना याबद्दल माहिती देताना सांगितले, आचार्य अत्रे बरेच फटकळ होते, त्यांच्या तावडीतून कोणीच सुटले नाही. तत्कालीन सगळे राजनेते त्यांच्या अनेकदा अनर्गल वाटाव्या अशा टिकेचे धनी झाले होते. नेहरूंवर अत्रे यांनी खूप वेळेस त्यांच्या ‘अत्रेशैली’त टिका केली म्हणून काही काॅंग्रेस पक्ष किंवा महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेते त्यांच्यावर तुटून पडले नाहीत. याच अत्रे यांनी नेहरू गेल्यावर सलग दहा दिवस ‘मराठा’मधून नेहरूंच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे व गुणगान अग्रलेख लिहिले. त्या अग्रलेखांचे संकलन असलेले, वाड़मयीन मूल्य असलेले ‘सूर्यास्त’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे.History

(History) अत्रे यांनी यशवंतराव चव्हाणांना अपत्य होत नव्हते म्हणून खूप खालच्या पातळीवर जाऊन लिहिले. यात यशवंतरावांच्या पत्नी वेणूताईंना खूप मानसिक त्रास झाला. यशवंतराव चव्हाण, जे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी अत्रे यांच्याशी संपर्क साधून वास्तवाची कल्पना दिली. पहिल्या गरोदरपणात गर्भपात झाला व वेणू पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही, असा तो कठिण प्रसंग यशवंतराव यांनी सौम्यपणे अत्रे यांना सांगितला. त्यावर अत्रे यांनी नतमस्तक होत त्यांची व वेणूताईंची माफी मागितली.History
डॉ. बाबुराव तनपुरे यांची सविस्तर माहिती कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. गंगाधर पाटील जाधव यांनी दिली होती ती अशी, पारतंत्र्याच्या राजवटीत देशाचे चित्र विदारक होते. पारंपरिक पद्धतीने शेतीची कामे केली जात होती. दुसऱ्या महायुद्धामुळे जागतिक आर्थिक मंदी आली होती. अनेक साम्राज्यशाह्या नष्ट झाल्या होत्या. अशा काळात बाबूराव बापुजी तनपुरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात २० डिसेंबर १९१४ रोजी राहुरी येथे झाला. दादा या नावाने ते परिचित होते. दादांचे वडील लक्ष्मण आप्पाजी तनपुरे हे शेतीवर उपजीविका करीत होते. चुलते बापुजी यांनी दादांना दत्तक घेतले. दत्तक मातोश्री झुंगाबाई यांनी दादांवर संस्कार केले.
बाबूराव तनपुरे यांचे शिक्षण राहुरी येथे सातवीपर्यंत झाले. त्यानंतर इंग्रजी शाळेत जाण्यासाठी एक वर्षाचा कोर्स करावा लागत होता. हा एक वर्षाचा कोर्सही दादांनी पूर्ण केला. शिक्षण घेत असताना दादांनी पोहण्याचा छंदही जोपासला होता. कुस्तीमध्येही दादा रममाण झाले. त्यांचे वागणे रूबाबदार होते. दादांनी जिल्हा मराठा प्रसारक मंडळाच्या मदतीसाठी ह.कृ. काळे, विष्णू दिघे यांच्या प्रोत्साहनाने ‘आग्य्राहून सुटका’ हे नाटक बसविले. त्यामध्ये दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली. या नाटकातून तब्बल २ हजार ९०० रूपये आर्थिक मदत मिळाली होती. पुढे जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळातून प्रेरणा घेत राहुरी येथे पत्की गुरूजींना प्रोत्साहन देऊन विद्या मंदिरची मुहूर्तमेढ रोवली.
 शिक्षण झाले की शेती किंवा जमल्यास नोकरी करण्याचा प्रगाध त्याकाळी होता. दादांना तलाठी किंवा तहसीलदार अशी कुठलीही नोकरी सहज मिळाली असती. परंतु त्यांनी नोकरी न करता राहुरी येथे जयवंतराव शेटे यांचे किराणा दुकानात व्यापाराचा अनुभव घेतला. त्यामुळे व्यापारी वृत्ती दादांमध्ये वृद्धिंगत झाली. दादांचे कर्तृत्व व हुशारी पाहून जयवंतराव शेटे खूश झाले. त्यांनी स्वत:ची मुलगी भागिरथीबाई यांच्यासोबत १९३५ मध्ये दादांचा विवाह लावून दिला. भागिरथीबाई तनपुरेंच्या सूनबाई म्हणून आल्या अन् परिवाराची जेमतेम असलेली परिस्थिती बदलली. तनपुरे घराण्यात लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आली. विवाहानंतर दादांनी पारंपरिक शेतीला छेद देत व्यापारी पद्धतीचा अवलंब केला.
 बागायती पाटपाणी असलेल्या शेतजमिनीमध्ये जुनी मोसंबीची बाग मोडून नवीन बाग लावली. मोसंबीच्या बागेत घासाचे आंतरपीक घेतले. त्यावेळी मोसंबीला फळे येण्यासाठी पाच-सहा वर्षांचा कालावधी लागत असे. तोपर्यंत दादांनी तीन वर्ष घासाचे पीक घेतले. दादांचे बंधू दगडूराम तनपुरे हे घास विक्री करीत. त्यांच्याबरोबर दादांनी घासाची शेती व विक्रीचे तंत्र अवगत केले. दादांची शेती पिकाची दूरदृष्टी आजच्या शेतकऱ्यांसमोर आदर्श ठरावी अशी होती. साधारणत: ८० वर्षापूर्वी दादांनी तीन वर्षाचा घास झाल्यानंतर त्यामध्ये नांगर न फिरविता घासाचे बी धरले. त्यातून तब्बल २९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. त्यावेळचे २९ हजार रूपये आजच्या घडीला २५ लाखापेक्षा अधिक होत. घासाच्या बियाण्यामुळे तनपुरे परिवाराच्या भरभराटीला दिशा मिळाली.
मोसंबी झाडांची मशागत, फळांची प्रतवारी करून सुरूवातीला विक्रीही केली. त्यासाठी आडत दुकान काढले. बाबूराव बापुजी तनपुरे असे दुकानाला नाव देण्यात आले. मोसंबीचे व्यापारी पद्धतीने मार्केटिंग केले. अनेक शेतकऱ्यांची मोसंबी विकत घेऊन ती मुंबईला पाठविली. शेतकऱ्याचा मुलगाही मोठा व्यापारी होऊ शकतो, हे दादांनी दाखवून दिले. मोसंबीला डायबॅक नावाचा रोग आला. त्यामुळे मोसंबीची बाग नामशेष झाली. मोसंबीनंतर ऊस पिकाचे राहुरी परिसरात आगमन झाले. येथील शेतकरी ऊसाचा गुळ करीत असत. शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळावे, म्हणून दादांनी गुळ खरेदी सुरू केली. दादा लिलावात उशिरा आल्यास शेतकरी म्हणायचे, ‘दादांना येऊ द्या, मग लिलाव सुरू करा.’ व्यापारीही दादा आल्यानंतर गुळाचा लिलाव करीत. दादांमुळे गुळाला अधिक भाव मिळतो, असा आत्मविश्वास शेतकऱ्यांना होता.
१९५२ साली दुष्काळ पडला. जेवणावाचून अनेकांचे हाल होत. धान्याचा तुटवडा पडला. त्यासाली दादांच्या कन्या रत्नमाला यांचा विवाह करण्यात आला. विवाहाच्या निमित्ताने राहुरीकरांनी पहिल्यांदा विद्युत रोषणाई पाहिली. लग्नानिमित्त एक महिना राहुरी तालुक्यातील लोकांना जेवणावळ सुरू होती. दुष्काळी कामाच्या ठिकाणीही भाऊबंद व मित्रांच्या मदतीने जेवण पोहोच करण्यात आले. त्यामुळे दादांनी केलेल्या अन्नदानाची चर्चा राज्यभर झाली.
प्रतिष्ठितांना त्यावेळी ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती मिळत होती. या ऑनररी मॅजिस्ट्रेटकडे दंडात्मक अधिकार होते. हे पद दादांना चालून आले. कालांतराने गुळाला मंदी आली. त्यामधून बाहेर पडण्यासाठी दादांच्या डोक्यात साखर कारखाना सुरू करण्याचा विचार आला. साखर कारखाना काढणे सोपे नव्हते. परंतु दादांवर शेतकऱ्यांचा खूप भरोसा होता. साखर कारखाना सुरू करण्याचे पाऊल उचलले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले. बैठकीला वाघुजी रामजी पाटील, आण्णा पाटील कदम, अनंतशेठ धावडे, शिवराम राजुळे उपस्थित होते. मात्र, दादांच्या कल्पनेला विरोध झाला. कारखान्याला नकार मिळाल्याने दादांनी कोपरगाव येथे गणपतराव औताडे, के.बी. रोहमारे, शंकरराव काळे यांच्या मदतीने कारखाना काढण्याचे ठरविले. त्यानंतर दादांनी कारखाना रजिस्टर केला. त्यामध्ये दादा संचालक होते.
 कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुन्हा राहुरीला साखर कारखान्याला झालेला विरोध ही चूक होती, असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर राहुरी साखर कारखाना सुरू करण्यासाठी दुसरी बैठक देवळाली प्रवरा येथे झाली. त्यामध्ये कारखाना उभारणीला उपस्थितांनी हिरवा कंदील दाखविला.
अखेर ता.५ मे १९५४ रोजी राहुरी कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बैठकीत ३१ सभासदांची समिती तयार करण्यात आली. त्यामध्ये मुख्य संतालक म्हणून दादांची निवड झाली. राहुरी कारखाना सुरू करताना व्यापाऱ्यांकडून जबर विरोध झाला. शेतकऱ्यांनी पैसे, दागिने व्यापाऱ्यांकडे ठेवलेले होते. एक हजार रूपयांचा शेअर्स भरण्यासाठी शेतकऱ्यांचे पैसेही व्यापारी देत नव्हते. शेतकऱ्यांचे पैसे व्यापाऱ्यांना बिनव्याजी वापरायला मिळत होते. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना त्यांचेच कष्टाचे पैसे देण्यास नकार देत. शेतकऱ्यांनी महिलांच्या अंगावरील दागिने, जनावरे विकून शेअर्ससाठी पैसे जमविले. शेतकऱ्यांनी जमेल तसे पैसे जमा करून राहुरी कारखाना सुरू करण्यासाठी खारीचा वाटा उचलला.
 कारखाना सुरू करताना दादांनी सर्व विचारांच्या लोकांना बरोबर घेतले. दादांनी जनसंघाचे अण्णा पाटील कदम, कम्युनिस्ट विचारांचे पी.बी. कडू पाटील आदींना बरोबर घेतले. पहिल्या संचालक मंडळात समाविष्ट होण्यासाठी कारखान्याचे २५ शेअर्स घेणाऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये चंद्रभान डाकले, वाघुजी बडधे, शिवराम राजुळे, मुन्शीबेग इनामदार, अण्णा पाटील कदम, अनंतशेठ धावडे व स्वत: दादांचा समावेश होता. शेअर्स गोळा करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी म.वा. देसाई यांनी अतिशय मोलाची मदत केली. देसाई यांनी शेतकऱ्यांना चारा तगाई, बैल तगाई अशा स्वरूपात कर्ज मंजूर केले. एका दिवसात ८० हजार रूपये जमा करून दिले. भागभांडवलासाठी दीड लाख रूपये कमी पडत होते. नंतरच्या काळात ही रक्कमही गोळा करण्यात आली. सुरूवातीला कारखान्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. दादांनी कारखाना काटकसरीने चालवून राज्यात सर्वाधिक एक रूपया अधिक भाव देण्याची किमया केली.
दादांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ अभिनेते निळू फुले यांना पडली. राहुरी कारखान्याच्या सहकार चळवळीवर ‘सामना’ हा चित्रपट काढला. चित्रपटाच्या एका भागाचे चित्रीकरण राहुरी कारखान्यावर झाले. दादांना १९६२ व १९६७ मध्ये आमदारकीची संधी मिळाली. १९६७ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिवेशन राहुरी कारखान्यावर झाले. अधिवेशन जाणीवपूर्वक कारखान्यावर ठेवण्यात आले. यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणावर दादांची छाप पडली.
 पुढीलकाळात दादांनी विविध प्रकल्प उभे केले. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यामुळे शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली झाली. कापूस उत्पादकांच्या हितासाठी जिनिंग प्रेसींगचा प्रकल्प सुरू केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर एकाधिकार कापूस खरेदी केंद्र राहुरीला सुरू करण्यात आले. मुळा धरणाला डावा कालवा नव्हता. त्यामुळे राहुरीच्या उत्तर बाजूला पाणी मिळत नव्हते. दादांनी तत्कालिन पाटबंधारेमंत्री बी.जे. खताळ यांच्याकडे पाठपुरावा केला. खताळ पाटील यांनी विशेष मदत केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला स्थापन झाले. त्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. पां.वा. पवार यांनी इंग्रजी पेपरमध्ये इलेक्ट्रीक सोसायटीसंदर्भात जाहिरात वाचली. पवार यांनी दादांना ही माहिती पुरविली. त्यानंतर दादांनी मुळा प्रवरा इलेक्ट्रीक सोसायटीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी तत्कालीन मंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. भागडा चारीची संकल्पनाही दादांची होती. पुढे आमदार प्रसाद तनपुरे यांच्या कालावधीत ती पूर्ण झाली. शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली. खरेदी विक्री संघ, राहुरी तालुका फ्रुट ग्रोअर्स सोसायटी, राहुरी नगरपरिषद, शेतकरी सूतगिरणी, मोटार वाहतूक संस्था आदी संस्थांची मुहूर्तमेढ दादांनीच रोवली.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बाबूराव दादा तनपुरे यांनी शेतकरी, व्यापारी, समाजसेवक व स्वातंत्र्यसैनिक म्हणून देशसेवेसाठी दिलेले योगदान महत्वाचे ठरले. राहुरी तालुक्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते. राहुरी कारखान्याची स्थापना करण्याबरोबरच संगमनेर कारखाना, श्रीगोंदा कारखाना, कोपरगाव कारखाना आदींना दादांनी मदत केली. दादा नसते तर संगमनेर कारखाना उदयाला आला नसता. मंत्रिमंडळात दादांना महत्वाचे खाते मिळत होते. मात्र मंत्रिमंडळात स्वारस्य नसल्याने त्यापासून ते सदैव दूर राहिले. एका कारखान्यामुळे उद्योगधंदे आले. लोकांना रोजगार मिळाला. शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या. विकासाच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास गेल्या. मग कल्पना करा दादांनी कारखाना काढला नसता तर ही विकासगंगा घरोघरी पोहचली असती का? कुणाचेही फारसे मार्गदर्शन नसताना विविध विचारांच्या मित्रांना बरोबर घेऊन दादांनी राज्यात स्वत:चा ठसा उमटविला. दादांचा इतिहास म्हणजे नवीन पिढीला दीपस्तंभ ठरावा असा आहे.
परिचय : जन्म : २० डिसेंबर १९१४, गाव – राहुरी. भूषविलेली पदे : १९५२ – ऑनररी मॅजिस्ट्रेट म्हणून नियुक्ती. १९५४ – राहुरी कारखान्याची स्थापना व मिथ्या संचालक म्हणून निवड. १९६२ व १९६७ – आमदार.

हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading