press: पत्रकार देखील समाजाचा 1 नेता – दादा पाटील तथा सुधीर लंके; शिवाजी महाराजांनी दर्गा व मशिदी पाडल्या नाहीत; ‘कै.अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार’ लंके यांना प्रदान

श्रीरामपूर | २३ जानेवारी | सलीमखान पठाण

(press) छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले. शिवाजी महाराजांच्या काळात कधी मशिदी, दर्गा पाडल्या गेल्या नाहीत तर त्या बांधण्यात आल्या तसेच शाहू महाराजांनी सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी गंगाराम कांबळे सारख्या मागासवर्गीय व्यक्तीच्या हॉटेलवर चहा पिऊन समाजाला एक वेगळा संदेश दिला. आज या पद्धतीने सामाजिक वातावरण बदलत आहेत त्यामध्ये पत्रकाराची महत्त्वाची भूमिका आहे. त्याप्रमाणे राजकीय पुढारी आपल्या नेतृत्वाद्वारे राजकीय प्रश्न सोडवतात त्याप्रमाणे समाजाचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचे काम पत्रकार करतात म्हणून पत्रकार हा देखील समाजाचा नेता आहे. असे म्हटल्यास वावगे होणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार दादा पाटील तथा सुधीर लंके यांनी केले.

press
(फाईल फोटो)

(press) माजी आमदार लहु नाथा कानडे यांच्या लोकहक्क फाउंडेशन तर्फे दरवर्षी दिला जाणारा कै.अशोक तुपे पत्रकारिता पुरस्कार यावर्षी दादा पाचील तथा सुधीर लंके यांना समारंभपूर्वक देण्यात आला. त्याप्रसंगी झालेल्या व्याख्यानात छत्रपती व शाहू महाराजांचा महाराष्ट्र या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार कानडे होते तर मंचावर माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, उद्योजक सारंगधर निर्मळ, अरुण पाटील नाईक, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, अशोक नाथा कानडे, भास्करराव खंडागळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, संपादक करण नवले, महेश रक्ताटे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सुधीर लंके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उपस्थित शहर व तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान गुलाब पुष्प व माजी आमदार लहु कानडे लिखित पुस्तके देऊन करण्यात आली.

आपल्या प्रमुख भाषणात सुधीर लंके पुढे म्हणाले, आज धर्माधर्मामध्ये तेढ वाढविण्याचे काम होत आहे परंतु फुले, शाहू, आंबेडकर यांच्या काळामध्ये ही परिस्थिती नव्हती. अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यादेवीनगर करण्यामागे जे काही राजकारण झाले असेल ते सर्वश्रुत आहे. मात्र अहिल्याबाई होळकर या सुद्धा सर्वधर्माचा आदर करणाऱ्या होत्या. त्यांनी कधी ही ‘फक्त हिंदुत्वा’चा पुरस्कार केला नाही.
अहमदनगरचे बादशाह अहमद निजामशाह यांनी स्वतः हे शहर वसवले होते. त्याचा स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे परंतु आज समाज ज्या दिशेने जात आहे ती परिस्थिती पाहिल्यानंतर पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे, हे मात्र निश्चित. निवडणुकीनंतर येणारे शासन हे कोणत्याही एका पक्षाचे नसते तर ते राज्यातील सर्व रयतेचे असते, हे लक्षात ठेवण्याची गरज आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. त्यांचे सर्व प्रमुख सरदार मुसलमान होते. त्यांचा वकील मुसलमान होता तर या उलट औरंगजेबाच्या सैन्यात देखील हिंदू सैन्य होते. त्यांचा वकील हिंदू होता. त्यामुळे त्या काळातील सामाजिक वातावरण हे हिंदू विरुद्ध मुसलमान किंवा जातीयवादी नव्हते तर ते साम्राज्य वाढविणारे होते.
शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही मशीद व दर्गा पाडण्यात आला नाही तर अनेक मशिदी व दर्गे बांधण्यात आले याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आम्ही मात्र आज शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या देशात लोकशाही फक्त नावाला राहते की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराज यांच्या काळातील सामाजिक, राजकीय परिस्थिती समजावून घेऊन समाजामध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे असे ही ते म्हणाले.
प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक यांनी केले. यावेळी भास्करराव खंडागळे, सुनील मुथा, अनुराधाताई आदिक, सारंगधर निर्मळ आदींनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात माजी आमदार लहु कानडे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत घडलेल्या घटनांचा ओझरता परामर्श घेतला. भाजपसोबत गेल्याने मला मागील वेळी ज्यांनी मतदान केले त्यांनी यावेळी मतदान केले नाही परंतु ‘राजकारणामध्ये धर्म वेगळी गोष्ट आहे, धोरण वेगळी गोष्ट आहे.’ पुलोदच्या सरकारमध्ये उत्तमराव पाटील, हशु आडवाणी ही जनसंघाची मंडळी होती म्हणून शरद पवारांची धोरणे बदलली नाहीत. तसेच पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे प्रतिनिधी होते म्हणून काँग्रेसची धोरणे ही बदलली नाही. त्यामुळे मतदारांचा दोष नाही तर पक्षाची ध्येय धोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो असे सांगून श्रीरामपूर तालुक्याने माझ्यासारख्या परक्या माणसाला स्वीकारले. आमदारकीची संधी दिली. त्यामुळे मी सदैव श्रीरामपूरकरांच्या ऋणात राहील असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले तर अशोक कानडे यांनी आभार मानले.

हे ही वाचा : india news: हिंदूंनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नदीतील मासे खावेत की नाही? सत्येंद्र पीएस संपादित सनातन धर्माचा आयुर्वेद मांसाहार संदर्भ असलेला ‘औषधी ग्रंथ’ : मांसौषधि

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *