अहमदनगर (प्रतिनिधी) ९.६.२४
येथील विकासवर्धिनी संस्थेच्या वतीने अहमदनगर शहरात ‘रोजगार अभियान’ हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत मोफत प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले, सध्या बेरोजगारीची मोठी समस्या असून सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे स्वयंरोजगार हा त्यावरील प्रभावी उपाय आहे. व्यवसायाचे योग्य प्रशिक्षण घेतल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकेल. त्या दृष्टीने विकासवर्धिनी संस्थेने अहमदनगर शहरात पुढाकार घेतला असून रोजगार निर्मितीच्या उद्देशाने ‘रोजगार अभियान’ हाती घेतले आहे.
शहरातील युवक, महिला व पुरुष यांना विविध व्यवसायांचे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील ५०० लाभार्थींना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने संगणक, शिवणकाम, एम्ब्रॉयडरी, रिसेप्शनिस्ट, सेक्युरिटी गार्ड अशा विविध विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतील किंवा नोकरीदेखील मिळवू शकतील. हे सर्व प्रशिक्षण सरकारच्या विविध योजनांचा उपयोग करून दिले जाणार आहे तसेच प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना शासकीय प्रमाणपत्र दिले जाणार आहे, असे देशमुख यांनी सांगितले.
तीन ते सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण विनामूल्य असून या प्रशिक्षणात १५ ते ४५ वयोगटातील युवक, महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर त्यांना केंद्र सरकारच्या मुद्रा योजने अंतर्गत आवश्यक ते कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ता. २५ जून २०२४ पूर्वी नांव नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी ‘विकासवर्धिनी, द्वारा – आय.एस.डी.टी., निर्मल चेंबर्समागे, हार्मो केअर लॅबसमोर, लालटाकी अहमदनगर अथवा ९४२२२२२६९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विकासवर्धिनीच्या वतीने करण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.