ग्रंथपरिचय | किशोर मांदळे
उजव्या शक्तींनी पुरस्कृत केलेला भारतीय राष्ट्रवादाचा संभाव्य चेहरा हा सामान्य माणसाला भयभीत करणारा चेहरा आहे. तो बहुसंख्यांकांच्या धार्मिक ध्रुवीकरणावर, वर्चस्ववादावर आधारलेला व म्हणूनच सर्वसमावेशक राष्ट्रवादी चेहरा नाही. आणि सर्वसमावेशक नसलेला राष्ट्रवाद हा निकोप राष्ट्रवाद कसा असू शकेल ?
प्रस्तुत पुस्तकात, या निकोप व सर्वसमावेशक राष्ट्रवादाला अडथळा ठरणारी द्वि-राष्ट्र संकल्पनेची परत्वे फाळणीची बिजे ‘हिंदू काँग्रेस’ वर्तनव्यवहारात व भारतीय भूमीत जन्मलेल्या उर्दूला मुस्लिमांची भाषा ‘ठरवून’ केलेल्या विरोधात कशी आहेत, याचा आढावा येतो. वंदेमातरम गीताची ‘आनंदमठ’ कादंबरीतील मुस्लिमद्वेष्टी उपस्थिती व गोरक्षण व नागरलिपीच्या आग्रहाच्या आडून चालविलेली मुस्लिमद्वेष्टी कथने मिळून एकेरी बहुसंख्यांकवादी राष्ट्रवादासाठी जमीन कशी तयार होत आली याचाही आढावा येतो.
फाळणी टाळण्याच्या संदर्भाने भारतीय मुस्लिम विद्वत जगाने (उलेमांनी) मुस्लिमांना परकीय ठरविण्याच्या विरोधात संघर्ष केला. तसेच उर्दूला ज्ञानभाषा व भारतीय समाजाचे सर्वधर्मीय संचित बनविण्यासाठी देखील मूल्यभान व अपूर्व योगदान दिले. हिंदू, जैन, शिख, बौद्ध यांचे बहुतांशी धार्मिक, दार्शनिक साहित्य उर्दू भाषेत भाषांतरित झाले आहे. हा सर्व तपशील आश्वासक व अचंबित करणारा आहे.
बहुसंख्यांकांचा धर्माधारित वर्चस्ववादी एकेरी राष्ट्रवाद नव्हे तर भारतीय समाजाला त्याच्या बहुसांस्कृतिक संचिताशी नाते सांगणारा सर्वसमावेशक राष्ट्रवाद पाहिजे आहे. कारण, आपल्या आकांक्षा, उत्कर्षाची शक्यता असलेली स्वायत्त राजकीय वाटचाल या एकेरी व वर्चस्ववादी दमनकारी राष्ट्रवादात सर्वधर्मीय श्रमिक व उपेक्षित जनता कशी करू शकेल ?
जनतेचा जनवादी राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक राष्ट्रवादच असला पाहिजे, या तार्किक निष्कर्षाकडे सरफराज अहमद यांचे प्रस्तुत पुस्तकातील विवेचन घेऊन जाते.