शेवगाव | प्रतिनिधी | २७.६.२०२४
अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेवगाव तहसील व कृषी अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रशांत सांगडे व कार्यालयीन कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांना देण्यात आले.
पंतप्रधान पीकविमा योजनेतील खरिप व रब्बी हंगामातील पीक विमा भरपाई २०२३-२४ सर्व शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावी. महाराष्ट्रात कृत्रिमरीत्या निर्माण करण्यात आलेली बियाणे आणि खतटंचाई यातून शेतकऱ्यांची लूट केली आहे याची चौकशी करून शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे सवलतीच्या दरात मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावीत. गतवर्षीच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकरी यांना खरीप पिकासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप वाटप न केलेली नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावी. केंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे ठरवूनच जाहीर करावेत. प्रीपेड व स्मार्ट मीटर योजना विज ग्राहकांवर सर्व प्रकारचा बोजा टाकणारी अन्यायकारक असून रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या असून वरील मागण्यांबाबत तहसीलदार प्रशांत सांगडे व कृषी अधिकारी वैष्णवी घुले यांच्याशी त्यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली.
सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे दुष्काळ व अतिवृष्टीचे अनुदान मंजूर असून त्यांनी केवायसी केली नसल्याने अनुदान वाटपात अडचणी येत आहेत तरी अशा शेतकऱ्यांनी ताबडतोब केवायसी करून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार यांनी केले.
आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे, किसान सभेचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव राशिनकर, शेतकरी संघटनेचे दत्तात्रय फुंदे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. भगवानराव गायकवाड, कॉ. संदिप इथापे, वैभव शिंदे, दत्तात्रय आरे, कॉ. बबनराव पवार, बबनराव लबडे, ॲड भागचंद उकिर्डे, ॲड. गणेश ताठे, राम लांडे, गोरक्षनाथ काकडे, बाबुलाल सय्यद, साहिल लांडे, भाऊ बैरागी, विनोद मगर आदी सहभागी झाले होते.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.