मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (डब्ल्यूसीएल) २०२४ च्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. यासह भारताने या स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकावले. साखळीमध्ये भारताने दोन सामने जिंकले होते आणि तीन सामने गमावले होते. मात्र, चांगल्या धावगतीमुळे युवराज सिंगचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर होता. त्याचवेळी पाकिस्तानने साखळीमध्ये चार सामने जिंकले आणि एकात पराभव पत्करला.
बर्मिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शोएब मलिकच्या ४१ धावांच्या झंझावाती खेळीमुळे पाकिस्तानने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या. प्रत्युत्तरात अंबाती रायडूच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने १९.१ षटकांत पाच गडी गमावून १५९ धावा केल्या आणि पाच गडी आणि पाच चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
१५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात दमदार झाली. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांच्यात पहिल्या विकेटसाठी ३४ धावांची भागीदारी झाली होती जी आमिरने भेदली. त्याने उथप्पाला आपला बळी बनवले. त्याला केवळ १० धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सुरेश रैनाला काही विशेष दाखवता आले नाही आणि तो चार धावा करून तंबूमध्ये परतला. यानंतर गुरकिरत सिंग मान यांने सामन्याचा ताबा घेतला. त्याने रायडूसोबत तिसऱ्या विकेटसाठी २५ धावांची भागीदारी केली. या सामन्यात रायुडूने अर्धशतक झळकावले. त्याने १६६.६६ च्या धावगतीने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी मान दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३४ धावांची खेळी करून बाद झाला. या सामन्यात युसूफ पठाणने ३० धावा केल्या. युवराज १५ धावांवर तर इरफान ५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून आमिरने दोन तर सईद अजमल, वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात संथ होती. कामरान अकमल आणि शर्जील खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १४ धावांची भागीदारी झाली जी अनुरीत सिंगने भेदली. त्याने शर्जीलला राहुल शुक्लाकरवी झेलबाद केले. त्याला केवळ १२ धावा करता आल्या. यानंतर कामरान आणि सोहेब मकसूद यांनी सामन्याचा ताबा घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३० धावांची भागीदारी केली. मकसूद १२ चेंडूत २१ धावा करून तंबूमध्ये परतला. त्याचवेळी अकमल चार चौकारांच्या मदतीने २४ धावा करून बाद झाला. या सामन्यात शोएब मलिकने पाकिस्तानकडून सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ३६ चेंडूंचा सामना केला आणि तीन षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. या सामन्यात युनूस खानने सात धावा, मिसबाह उल हकने १८ धावा, आमिर यामीनने सात धावा केल्या. तर शाहिद आफ्रिदी आणि सोहेल तनीर अनुक्रमे ४ आणि १९ धावा करून नाबाद राहिले. भारताकडून अनुरीत सिंगने तीन तर विनय कुमार, पवन नेगी आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
अंबाती रायडूला सामनावीर तर युसुफ पठाणला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.